आंबा वाहतूक गाडय़ांतून प्रवास : मालवणात चौघांवर गुन्हे
वार्ताहर / मालवण:
आंब्याच्या वाहनांमधून मुंबईतील चाकरमान्यांना गावी आणल्याप्रकरणी गाडीचालक महेश बाळू सांडव (रा. कर्लाचाव्हाळ) व गोपाळ जयवंत कवटकर (रा. सर्जेकोट) याच्यासह गाडीतून प्रवास करणाऱया विष्णू बाळू सांडव व ओमकार गोपाळ कवटकर अशा चौघांविरोधात मालवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही वाहन चालकांच्या बोलेरो गाडय़ाही मालवण पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
आंबा वाहतुकीचा पास घेऊन मुंबईला आंब्याच्या गाडय़ा घेऊन जाणाऱया मुंबईतील व्यक्तींना घेऊन गावी आल्याची घटना देवगड येथे उघडकीस आली होती. त्यानंतर सर्वच ठिकाणी आंबा वाहतुकीच्या गाडय़ांवर लक्ष ठेवण्यात येत होते. मालवण तालुक्यातील चौके आणि सर्जेकोट येथे मुंबईतून काही व्यक्ती आल्याची माहिती मालवण पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार मालवण पोलिसांनी तातडीने त्यावर कारवाई करीत मुंबईहून आलेल्या व्यक्तींची चौकशी करून दोन वाहन चालकांसह गाडीतून प्रवास करणाऱया दोघांवर गुन्हा दाखल केला. पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी सुभाष शिवगण, राजन पाटील, मंगेश माने, विलास टेंबुलकर, हेमंत पेडणेकर, गुरुदास परब, प्रसाद आचरेकर, शेखर मुणगेकर, पोलीस पाटील पांडुरंग चव्हाण यांनी ही कारवाई केली.
चौघांवर गुन्हा दाखल
महेश बाळू सांडव हे बोलेरो (क्र. एमएच 07 एजे 0324) व गोपाळ जयवंत कवटकर हे बोलेरो (क्र. एमएच 07 पी 2195) या वाहनातून अत्यावश्यक सेवेच्या पासचा उपयोग करून आंबा घेऊन मुंबई येथे गेले होते. मुंबईहून येताना महेश सांडव याने आपला भाऊ विष्णू बाळू सांडव याला, तर गोपाळ कवटकर याने आपला मुलगा ओंकार गोपाळ कवटकरला बोलेरोतून मालवणला आणले. त्यामुळे मालवण पोलिसांनी चौघांवरही गुन्हा दाखल केला आहे. मुंबईहून आलेल्या दोन्ही व्यक्तींची तातडीने तपासणी करण्यात आली. त्यांना घरातच वेगळे राहण्याची सूचना करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईहून वाहतूक करणाऱया गाडय़ांमधून लोकांना घेऊन येऊ नये. तसा प्रकार आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस निरीक्षक चौधरी यांनी दिला आहे.









