मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आश्वासन
प्रतिनिधी/ पणजी
शशिकलाताईंकडून नवीन पिढीला भरपूर घेण्यासारखे आहे. महिलांनी नेतृत्त्व करणे आवश्यक आहे. ताईंचा आदर्श ठेवून विविध क्षेत्रात महिला नेतृत्त्व तयार होणे गरजेचे आहे. याशिवाय शशिकलाताईंच्या जयंतीचा कार्यक्रम सरकारी पातळीवर करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. याचबरोबर पुढील वर्षांपर्यंत महिलाविषयक किंवा कुठल्या प्रमुख प्रकल्पांना शशिकलाताईंचे नाव देण्यात येईल याचा विचार करून त्याबद्दल निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोमंतक मराठा समाजातर्फे गोव्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री शशिकला काकोडकर यांच्या 86व्या जयंतीप्रित्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या मातृमेळाव्यात बोलताना दिले.
यावेळी व्यासपीठावर अंकोला (कर्नाटक) नगरपालिका व अंकोला अर्बन बँकेचे अध्यक्ष भास्कर नार्वेकर, उद्योजक यतीन काकोडकर, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश कामत, सत्कारमूर्ती डॉ. ललना बखले व डॉ. जयंती नायक, गोमंतक मराठा समाजाचे अध्यक्ष आनंद वाघुर्मेकर, सचिव मंगेश कुंडईकर, संयुक्त सचिव सतीश पैंगीणकर व समाजाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
गोव्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री शशिकलाताई कर्तृत्त्वान, वक्तृत्त्ववान, दातृत्त्ववान होऊन गेल्या. भाऊसाहेब बांदोडकर यांच्यानंतर अनेक मुख्यमंत्री होऊन गेले. काही मुख्यमंत्री झाले त्यांची नावेही आठवणीत राहिली नाहीत. परंतु मागच्या काही मुख्यमंत्र्यांची यादी पाहिली तर राजकारणात आणि समाजकारणात असतात त्यांचीच नावे लक्षात राहतात. परंतु समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत आपलेपणाचे नाव कोरतात ते म्हणजे भाऊसाहेबनंतर शशिकलाताई या निश्चितच आहेत. येणाऱया काळात ताईंचे नाव गोमंतकात कायमचे राहणार. भाऊसाहेबांच्यानंतर ज्या निवडणूका झाल्या त्या शशिकलाताईंच्या नेतृत्त्वाखाली झाल्या. शैक्षणिक क्षेत्र आणि औद्योगिक क्षेत्रात त्यांचे कार्य उल्लेखनीय होते. यामुळेच गोवा शैक्षणिक स्तरावर विकसित होत आहे. याशिवाय येणाऱया काळात विविध शैक्षणिक प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. त्यात एनआयटी, आयआयटी, खासगी शैक्षणिक संस्थेमार्फत आणि खासगी विद्यापीठ विधेयक माझ्या नेतृत्त्वाखाली सरकारने मंजूर केले असून उच्च स्तरावरील शिक्षणपद्धती गोमंतकीयांना मिळणार आहे असे मुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितले.
यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याहस्ते इयत्ता दहावी शालांत परीक्षेत प्रथम येणाऱया गायत्री उत्कर्ष आवडे हिचा सन्मान करण्यात आला. तसेच इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आले. तसेच सन 2000पासून ते 2020पर्यंत शैक्षणिक कर्ज वितरण योजनेला वीस वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सुरुवात केलेल्या समाजबांधव उमेश नाईक, दीपक बाणस्तारकर यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या गौरवामधील उदय बाळ्ळीकर, अरविंद वाडीकर व सुभाष साळकर गोव्याबाहेर असल्यामुळे सत्कारास उपस्थित राहू शकले नाहीत. याशिवाय 2019-2020चा उत्कृष्ट महिला समिती पुरस्कार प्रथम : फोंडा तालुका, द्वितीय पुरस्कार : बार्देश तालुक्याला देण्यात आला. स्व. शशिकलाताई काकोडकर स्मरणार्थ उत्कृष्ट सामाजिक कार्यकर्ती पुरस्कार डॉ. ललना बखले आणि डॉ. जयंती नायक यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
शशिकलाताईंची आर्यन लेडी म्हणून तुलना केली जायची. बहिणीच्या मायेने त्यांना गोमंतकीय ताई संबोधायचे. अनेक खाती त्यांनी यशस्वीरित्या हाताळली. महिलांना सक्षम करणारे निर्णय त्यांनी घेतले. ग्रामीण भाग शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून प्रयत्न केले. मराठी भाषा राजभाषा व मातृभाषेतून शिक्षण व्हावे यासाठी लढल्या असे उद्योजक यतीन काकोडकर यांनी सांगितले.
इतरांच्या तुलनेत माझे कार्य हे कणाएवढे आहे. पण जे केले ते प्रामाणिकपणे केले. डॉक्टरांविषयी दूषणे ऐकायला येतात. परंतु मी चुकूनसुद्धा दूषण बनून घेतले नाही. मी शेवटच्या श्वासापर्यंत काम करत राहीन असे डॉ. ललना बखले यांनी सांगितले. मला राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार लाभले परंतु याचे महत्त्व वेगळे आहे. असे डॉ. जयंती नायक यांनी सांगितले. दुसऱया सत्रात ‘घर सांभाळून सामाजिक दायित्व’ या विषयावर परिसंवाद झाला. त्यात सौ. निर्मला सावंत, डॉ. अनीता तिळवे, ऍड. स्वाती केरकर, सौ. अनिता कवळेकर यांनी भाग घेतला. यावेळी व्यासपीठावर महिला निमंत्रक सौ. उत्कर्षा बाणस्तारकर उपस्थित होत्या. तिसऱया सत्रात महिलांसाठी नाटय़छटा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यात तिसवाडी तालुका महिला समितीने प्रथम क्रमांक, काणकोण तालुक्याने द्वितीय तर तृतीय क्रमांक फोंडा तालुका महिला समितीने पटकावले. उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून सुनीता पेडणेकर व रंगीता वाघुर्मेकर यांना बक्षिसे प्राप्त झाली. परीक्षक म्हणून अनिकेत नांगर व समीर गडेकर यांनी काम पाहिले. राज्य पातळीवर स्व. शशीकलाताई काकोडकर यांची प्रतिमा रेखाटणे ही रांगोळी स्पर्धा आयोजित केली होती. त्यात उमेश नाईक (प्रथम), सुजल शिरोडकर (द्वितीय), आकाश नाईक (तृतीय), सुरज केरकर (चतुर्थ) तर गौतम उदयेकर याने पाचवा क्रमांक पटकावला. गजानन च्यारी, प्रसाद नाईक व अर्जुन च्यारी यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले. बक्षीस वितरण समारंभाला समाजाचे माजी अध्यक्ष ऍड. मनोज बांदोडकर व माजी सचिव प्रशांत मांद्रेकर उपस्थित होते. त्यांच्याच हस्ते बक्षिसे देण्यात आली.
सदर कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांचा परिचय लक्ष्मीकांत नाईक यांनी, स्वागतगीत रंगिता वाघुर्मेकर तर कु. अंबिशा वायंगणकर, सौ. महेश्वरी वळवईकर, सौ. सोनाली देविदास व सौ. यांनी मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. उर्वशी कवळेकर यांनी केले तर ऍड. हर्षा नाईक यांनी आभार मानले.