प्रतिनिधी/ मडगाव :
मडगाव पालिकेचे मुख्याधिकारी अजित पंचवाडकर यांनी रजेवर जाताना आपल्या कक्षाच्या चाव्या पालिकेकडे सुपूर्द न केल्याने त्यांच्या जागी तात्पुरता ताबा सांभाळणारे मुरगाव पालिकेचे मुख्याधिकारी अरविंद बुगडे यांना गुरुवारी कक्षाबाहेरच ताटकळत राहावे लागले. शेवटी नगराध्यक्ष व पालिका अभियंत्यांच्या कक्षांचा आसरा घेऊन महत्त्वाच्या फायली त्यांनी हातावेगळय़ा केल्या.
मुख्याधिकारी पंचवाडकर यांच्याविरुद्ध पालिकेतील एका महिला कर्मचाऱयाचा कथित विनयभंग केल्याची तक्रार असून गोवा पालिका कर्मचारी संघटनेकडून त्यांच्या बदलीची मागणी उचलून धरण्यात आली आहे. नगराध्यक्षा पूजा नाईक यांनी मुख्याधिकारी त्यांना प्रशासकीय कामांसंदर्भात विश्वासात घेत नसल्याची तसेच सूचना व निर्देशांचे पालन करत नसल्याची तक्रार पालिका संचालकांकडे केल्याने ते आधीच वादग्रस्त ठरले आहेत. आता पालिकेच्या मुख्याधिकारी कक्षाच्या चाव्या स्वतःकडे ठेवून घेतल्याने तसेच त्यामुळे तात्पुरता ताबा सांभाळणारे मुख्याधिकारी बुगडे यांना ताटकळत राहावे लागून अन्य कक्षांचा आसरा घ्यावा लागल्याने गुरुवारी सकाळी तो चर्चेचा विषय बनला.
सोमवारपासून पंचवाडकर रजेवर असून तेव्हापासून त्यांच्या कक्षात येणाऱया फायली कक्षाबाहेरच्या टेबलवर पडून होत्या. मुख्याधिकारी बुगडे यांनी गुरुवारी ताबा घेतला असता मुख्याधिकारी कक्ष चाव्यांविना खुला करणे शक्मय नसल्याने नगराध्यक्षांच्या कक्षात बसून त्यातील काही महत्त्वाच्या फायली हातावेगळय़ा केल्या. नंतर उर्वरित काम त्यांनी पालिका अभियंत्यांच्या कक्षात बसून केल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली. मुख्याधिकारी बुगडे यांनी सोनसडा यार्डाला भेट देऊन तेथे पाहणी केल्याचे सांगण्यात आले. सध्या सोनसडा येथील कचऱयावरील प्रक्रिया बंद पडलेली आहे.









