प्रतिनिधी/ कराड
येथील मार्केट यार्ड गेट क्रमांक एकपासून मलकापूरला जाणाऱया रस्त्याची शहर हद्दीत अतिशय दुरवस्था झाली आहे. गेली अनेक वर्षे या रस्त्याचे कारपेट काम करावे, अशी मागणी करण्यात येत होती. मात्र नगरपालिकेने निधी नसल्याचे कारण पुढे करत या रस्त्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे काही अज्ञात नागरिकांनी या रस्त्याचे फलक लावले. रविवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्याने प्रभाग बारासह संपूर्ण शहरात चर्चेचा विषय बनला होता. जवळ आलेली पालिका निवडणूक, त्यामुळे इच्छुकांत असणारी स्पर्धा तसेच नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत झाल्याने हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे.
प्रभाग 12 हा मार्केट यार्ड, ट्रान्सपोर्ट इमारत, बाजार समिती परिसर येथे आहे. या प्रभागात पल्लवी पवार व वैभव हिंगमिरे हे लोकशाही आघाडीचे नगरसेवक निवडून आले आहेत. लोकशाही आघाडी पालिकेत विरोधी बाकावर आहे. मार्केट यार्ड, मलकापूर ते नांदलापूर असा कोल्हापूर नाक्याला पर्यायी रस्ता आहे. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या रस्त्यासाठी कोटय़वधीचा निधी मंजूर केला होता. मात्र सात ते आठ वर्षे कोर्ट कचेऱया, लगतच्या नागरिकांचा विरोध यामुळे हा रस्ता प्रलंबित होता. मात्र हा रस्ता मलकापूर हद्दीत शासनाच्या निधीतून सिमेंटचा करण्यात आला आहे. त्यामुळे या रस्त्यावरील वर्दळ अलिकडे वाढली आहे. मात्र बाजार समितीपासून सुमारे अर्धा किलोमीटरचा रस्ता कराड पालिका हद्दीत असून या रस्त्याकडे पालिकेने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले आहेत.
हा रस्ता नव्याने कारपेट करावा, यासाठी स्थानिक नगरसेवकांसह नागरिकही आग्रही होते. यासाठी नगराध्यक्षा, मुख्याधिकारी यांच्याकडे मागणी करण्यात आली होती. मात्र निधी नसल्याचे कारण पुढे करण्यात आले होते. पालिका लक्ष देत नसल्याने काल रात्री संतप्त अज्ञात नागरिकांनी या रस्त्यावर विविध आशय असणारे फ्लेक्स लावले. रविवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर प्रभाग बारामध्ये खळबळ उडाली. सोशल मिडियावर फोटो व्हायरल झाले. त्यानंतर हे बोर्ड काही तरूणांनी काढले.
या सर्व प्रकारातून या रस्त्याच्या तसेच शहरातील विविध रस्त्यांच्या दुरवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान, या प्रभागात स्थानिक राजकारण उफाळून आल्याचे दिसत आहे. दरम्यान, या प्रकारानंतर येथील स्थानिक नगरसेवकांनी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या माध्यमातून 45 लाखाचा निधी मंजूर झाला आहे. त्याची टेंडर प्रक्रिया झालेली असून लवकरच या कामास प्रारंभ होत असल्याचे मेसेज सोशल मिडियावर व्हायरल केले आहेत.
आधी मलकापूर आता कराडची बारी
मलकापूर हद्दीत या रस्त्याचे काम सात ते आठ वर्षे रखडले. या रस्त्यावरील खड्डय़ामुळे बळीही गेला होता. त्यावेळी तुलनेत कराडच्या हद्दीतील रस्ता चांगला होता. आता मलकापूर हद्दीत शासनाच्या निधीतून, सार्वजनिक बांधकाम विभागाने सिमेंटचा रस्ता केला आहे. मात्र कराड हद्दीत पालिकेने लक्ष न दिल्याने रस्ता खराब झाला आहे. या रस्त्यावरून येणारे कराड हद्दीत खड्डय़ांमुळे त्रासून जात आहेत. त्यामुळे कराड पालिकेवर टीका होत आहे.








