प्रतिनिधी / इचलकरंजी
प्रदूषणाचा प्रमुख स्रोत असलेला व रसायनयुक्त औद्योगिक सांडपाणी थेट पंचगंगा नदीत सोडणारा काळा ओढा लॉकडाऊनमध्येही भरून वाहत आहे. यामधील काळेकुट्ट व फेसळणारे पाणी थेट पंचगंगा नदीत मिसळून प्रदूषण वाढवत आहे. शहरातील सर्व कारखाने बंद असताना इतक्या मोठ्या प्रमाणात येत असलेले रसायनयुक्त पाणी पाहून नागरिकांतून आश्चर्य व्यक्त होत आहे.
इचलकरंजीतील साडेआठ किलोमीटर लांबीचा काळा ओढा शहरातील लाखों लिटर औद्योगिक सांडपाणी पंचगंगेत सोडून नदी प्रदूषणात महत्वाची भूमिका बजावत होता. याविरोधात शिरोळ, इचलकरंजी येथील सामाजिक व राजकीय संघटनांनी वारंवार आंदोलन केली आहेत. मात्र या ओढ्यातील रसायनयुक्त पाण्यामध्ये किंचितही घट झाली नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या शहरातील सर्व व्यवसाय, उद्योग बंद आहेत. तसेच वस्त्रोद्योगातील प्रोसेस, सायझिंग, रंगण्या आदी कारखानेही पूर्णपणे बंद आहेत. यामुळे काळा ओढ्यातील पाणी कमी होणे अपेक्षित होते. मात्र याबाबत नेमकी उलट परिस्थिती आहे.
सध्या टाकवडे वेस येथील मलनि:सारण केंद्राजवळील काळ्या ओढ्यातील पात्र पूर्ण भरले असून बंधाऱ्यातील पाईप मधून काळे रसायनयुक्त पाणी मोठ्या प्रमाणात वाहत आहे. या पाण्यावर फेस आला असून उग्र दुर्गंधी परिसरात पसरली आहे. रविवारी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी प्रशांत गायकवाड व क्षेत्रीय अधिकारी सचिन हरभट यांनी काळा ओढ्याला भेट दिली होती. मात्र, त्यांनी केवळ तेथे पाहणी केली असून तपासणीसाठी पाण्याचे कोणतेही नमुने घेतले नसल्याचा आरोप पर्यावरणवादी कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. तरी याकडे प्रशासनाने वेळीच लक्ष देवून या रसायनयुक्त काळ्या पाण्याचा उगमचा शोध लावावा व कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.








