गृहमंत्री बसवराज बोम्माई यांचे राज्यातील जनतेला आवाहन
प्रतिनिधी / बेंगळूर
राज्यात कोरोनाने थैमान घातले असून त्यावर नियंत्रण आणण्यासाठी कठोर नियम लागू करण्यात आले आहे. राज्यात पुढील 14 दिवस क्लोजडाऊन जारी असणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने सरकारच्या मार्गसूचीचे पालन करून कोरोना थोपविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्री बसवराज बोम्माई यांनी केले आहे.
येथे पत्रकारांशी ते बोलत होते. पुढील 14 दिवस राज्यातील जनतेने स्वयंनिर्बंध घालून घ्यावेत. तेव्हाच कोरोना नियंत्रणात येणे शक्य आहे. कोरोना नियंत्रणासाठी राज्य सरकारने दिलेल्या दिशानिर्देशांचे पालन करून कर्फ्यू यशस्वी करावा, असे आवाहन त्यांनी राज्यातील जनतेला केले आहे.
महाराष्ट्रात तेथील सरकारने जारी केलेल्या कठोर नियमांमुळे तेथे कोरोना संसर्ग नियंत्रणात येत आहे. राज्यातही संसर्ग कमी करण्यासाठी जनतेकडून सहकार्य अपेक्षित आहे. सरकारच्या मार्गसूचीची अंमलबजावणी करण्यासाठी आपण पोलीस महासंचालकांना सूचना दिल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी पुढील 14 दिवस अनावश्यक बाहेर फिरू नये. पोलीस कठोर कारवाईऐवजी कायद्याची जाणीव करून देत आहेत. त्यावेळी जनतेने पोलिसांचे न ऐकल्यास मात्र कारवाई केली जाईल, असा इशारा गृहमंत्री बोम्माई यांनी दिला.
बांधकाम क्षेत्राशी संबंधीत कामगारांसह उत्पादन क्षेत्रातील कंपन्या, कारखान्यांमधील कामगारांना कामावर जाण्यास आणि घरी परतण्यासाठी कोणतेही निर्बंध असणार नाहीत. जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी सकाळी 4 तासांचा कालावधी देण्यात आला आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.









