केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी/ पणजी
शाश्वततेची कल्पना केवळ मानवच नव्हे तर पृथ्वीवरील प्रत्येक सजीव सृष्टीचा समावेश करते. विकास प्रक्रियेमुळे मोठ्या प्रमाणात कचऱ्याची निर्मिती झाली हे सत्य असले तरी ’कचरा ते संपदा’ तंत्रज्ञान वर्तुळाकार अर्थव्यवस्थेतील टिकाऊपणा सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. विकास आणि पर्यावरण संरक्षणासंबंधीची उद्दिष्टे एकाच वेळी साध्य होतील याची खात्री करण्यासाठी अशी अर्थव्यवस्था ही गुऊकिल्ली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय पर्यावरण वने आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी केले.
पणजीत आयोजित पहिल्या आंतरराष्ट्रीय पर्यावरण आणि शाश्वतता शिखर परिषदेच्या शनिवारी झालेल्या समारोप सत्रात ते बोलत होते. व्यासपीठावर त्यावेळी मंत्री नीलेश काब्राल, सीआयआयचे नितीन प्रसाद, मुख्य सचिव पुनीतकुमार गोयल, सीमा अरोरा आदी मान्यवर उपस्थित होते.
पृथ्वीवरील प्रत्येक सजीवासाठी शाश्वत भविष्य निर्माण करण्याच्या संकल्पनेवर आधारित या शिखर परिषदेद्वारे शाश्वत उपाय आणि सर्वोत्तम पद्धती सादर करणे, नेटवर्क करणे आणि शिकण्याचे अनुभव वाढवणे, नाविन्यपूर्ण कल्पनांची देवाणघेवाण करण्यासाठी व्यासपीठ प्रदान करणे, आदी उद्दिष्टे बाळगण्यात आली होती.
पुढे बोलताना श्री. यादव यांनी, शाश्वत विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी केंद्र सरकार करत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. केंद्रीय अर्थसंकल्पात हरित वाढीसाठी 35 हजार कोटींची तरतूद करण्यात आली असून ग्रीन क्रेडिट्स उपक्रमाद्वारे केंद्र सरकार शाश्वत भविष्यासाठी आपल्या वचनबद्धतेवर ठाम असल्याचे त्यांनी सांगितले.
मंत्री श्री. काब्राल यांनी आपल्या भाषणादरम्यान, विकास आणि शाश्वततेच्या गरजा पूर्ण झाल्याची खात्री करण्यासाठी गोवा सरकार करत असलेल्या उपाययोजना आणि प्रयत्नांवर प्रकाश टाकला. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने अधिक शाश्वत भविष्यात संक्रमण प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
श्री. प्रसाद यांनी आपल्या भाषणातून भारतीय उद्योग महासंघ तसेच परिषदेच्या तिन्ही दिवसांच्या कार्याचा आढावा घेतला.









