प्रसिद्ध लेखिका निलांगी शिंदे यांचे आवाहन
प्रतिनिधी /पणजी
शिवाजी महाराजांची रणनिती संपूर्ण जगभरात अभ्यासक्रमात शिकवली जाते. सध्या रसिया युक्रेन युद्धांतही हा गनिमीकावा वापरल्याचे बातम्या कानी येतात असा महान राज्याने प्रत्येक घरात जन्म घेण्यासाठी प्रत्येक मातांनी जिजाऊ बनून आपल्या घरात शिवाजी घडवावा असे आवाहन प्रसिद्ध लेखिका निलांगी शिंदे यांनी धारगळ येथे झालेल्या शिवजयंती उत्सवावेळी बोलताना केले.
धारगळ येथील श्री धारेश्वर माऊली मंदिराच्या पटांगणावर तिथीप्रमाणे झालेल्या शिवजयंती कार्यक्रमात प्रमुख पाहुणे या नात्याने त्या बोलत होत्या यावेळी त्यांनी शिवचरित्राचा तपशील उपस्थितांसमोर मांडल्या.
ओमकार प्रभुदेसाई आणि मित्रमंडळ गेली अनेक वर्षे धारगळ येथे तिथीवार शिवजयंती कार्यक्रम व मिरवणूक घडवून आणत असून यंदा मान्यवरांचा सत्कार समारंभ, व्याख्यान, मिरवणूक आणि शिवाजी महाराजांच्या जीवनावर ‘शौर्यकटय़ार’ या नाटकाचा प्रयोग सादर झाला.
गोव्यातील प्रसिद्ध संगितकार व गायक दामोदर कमलाकर शेवडे यांचा श्री धारेश्वर देवस्थानचे अध्यक्ष प्रकाश प्रभूदेसाई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यास सहकार्य करणाऱया मित्रमंडळींचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या सन्माननीय पाहुण्या सौ. गौतमी तुकाराम शेटये यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन करून शिवजयंतीसारख्या कार्यक्रमांची आजच्या काळात खरोखर आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले.
सना साटेलकर, सलोनी साटेलकर, गोविंद नाईक, समिक्षा साटेलकर, सारा म्हामल, श्रीअंश सुभाजी, उद्देश सातावळे या पथकाने पोवाडा सादर केला. सुरेखा किनळेकर, सान्वी देवजी व इतर बालकलाकारांनी विविध भुमिका सादर केल्या. शिवाजी महाराज्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग यावेळी रंगमंचावर जीवंत करण्यात आले. तसेच बाजीप्रभू, जिजाबाई, संभाजी, येसूबाई, मावळे अशा विविध पात्रांची वेशभुषा सादर झाली.
या कार्यक्रमाचे प्रमुख सुत्रधार घनःशाम प्रभूदेसाई, देविका प्रभुदेसाई, ओमकार प्रभूदेसाई यांनी कार्यक्रमाची धुरा सांभाळली. केशव कांबळी, संजय फडते, अमित माशेलकर, शांती किनळेकर, सुप्रिया माशेलकर, आदींनी सहकार्य केले. देविका प्रभूदेसाई यांनी पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.
ओमकार गोवेकर यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले व आभार मानले. रात्री शिगमोत्सवानिमित्त शिवाजी महाराज्यांच्या जीवनावर तीन अंकी नाटकाचा प्रयोग सादर झाला.








