प्रतिनिधी/ मडगाव
देशात झालेल्या प्रत्येक निवडणूकीत भाजपने यश मिळवलेले आहे. तसेच देशभरात भाजपचे कार्यकर्ते वाढत चाललेले आहेत. राज्यातील 80 टक्के जनतेचा पाठिंबा भाजपकडे आहे. त्यामुळे येणाऱया नगरपालिकेच्या निवडणूकीत जनतेच्या आशीर्वादाने प्रत्येक नगरपालिकेत भाजपची सत्ता असेल असा दावा गोवा भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तनावडे यांनी केला.
मडगाव येथील दक्षिण गोवा भाजपच्या कार्यालयात नायक यांच्या भाजप प्रवेशाच्या कार्यक्रमावेळी ते बोलत होते. यावेळी गोवा भाजप प्रदेशाचे सरचिटणीस दामू नाईक, दक्षिण गोवा भाजपचे अध्यक्ष तुळशीदास नाईक, मडगाव भाजप मंडळचे अध्यक्ष रुपेश महात्मे, केतन कुरतरकर, शर्मद रायतूरकर, नवीन पै रायकर व इतर उपस्थित होते.
यंदा झालेल्या जिल्हा पंचायत निवडणूकीत भाजपने उत्तर गोव्यात 25 उमेदवारांना उमेदवारी दिली होती तर दक्षिण गोव्यात 17 त्यातले उत्तरेत 21 व दक्षिणेत 14 उमेदवार विजयी झाले होते. स्वताच्या ताकदीवर भाजपने ही निवडणूक लढवली होती. तसेच अनेक विरोधकांनी भाजपचीं बदनामी करण्याचे प्रयत्न केले होते. त्या सर्वांना राज्यातील जनतेने योग्य उत्तर दिलेले आहे. काही नेते जि.पं.निवडणूकीत स्वताला वेळ मिळाला नसल्याचा आरोप करत आहे. यातून स्पष्ट होत आहे की या सर्व नेत्यांनी जनतेचा निवडणूकीपूर्तीच उपयोग केलेला आहे. तर भाजपने सतत जनतेच्या संपर्कात राहून त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे असे, तनावडे यांनी सांगीतले.
तसेच लॉकडाऊनच्या काळात भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक घरापर्यंत कडधान्य पोहचविण्याचे काम केले होते. इतर नेत्यासारखे हेल्मेट घालून फिरत नव्हते. जनतेचा विश्वास जिंकण्यासाठी जनतेच्या हितासाठी कार्य करावे लागते असे, तनावडे पुढे बोलताना म्हणाले.
दामू नाईक म्हणाले की, आज देशात भाजप शिवाय आणखी कोणताही पर्याय नाही. आम्ही इतर पक्षासारखे निर्णय घेण्यात वेळ काढत नाही. ज्या ठिकाणी भाजपने कधीच निवडणूक जिंकली नव्हती त्या त्या ठिकाणी आज आम्ही यशस्वी ठरलो.









