225 पोलिसांनी नगराला वेढले, 12 जण ताब्यात, 21 दुचाकी जप्त
प्रतिनिधी/ सातारा
सातारा जिह्यात वाढत असलेल्या गुह्यांना आळा घालण्यासाठी राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिलेल्या आदेशानुसार पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्या सुचनेनुसार शहरानजिकच्या संवेदनशील असलेल्या प्रतापसिंहनगरात रात्री चार तास सातारा पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवले. प्रतापसिंहनगरातील प्रत्येक घर आणि झोपडपट्टी पिंजून काढली. त्यामध्ये पोलिसांना चोरीचा ऐवज सापडला. पाच गुन्हे दाखल झाले असून 12 संशयितांना ताब्यात घेतले आहे. तसेच चोरीच्या 21 दुचाकी जप्त केल्या असून त्याची तपासणी सुरु केल्याची माहिती सातारा पोलिसांनी दिली.
सातारा पोलिसांना गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिलेल्या आदेशानुसार पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी जिह्यातील वाढत्या गुन्हेगारीला ब्रेक लावण्यासाठी शनिवारी रात्री 12 वाजता सातारा शहरानजिक जिह्यातील सर्वात मोठय़ा झोपडपट्टीत कोंबीग ऑपिरेशन राबवण्यात आले. या ऑपरेशनमध्ये दस्तुरखुद्द अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, सह पोलीस अधीक्षक श्रीमती आँचल दलाल, पाटणचे विभागीय पोलीस अधीक्षक थोरात, कोरेगावचे उपविभागीय पोलीस अधीक्षक केंद्रे, उपविभागीय पोलीस अधीक्षक साळुंखे, शाहुपूरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पतंगे, सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णसाहेब मांजरे, सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सज्जन हंकारे, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, भुईंज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आशिष कांबळे, उंब्रज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय गरुड, बोरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप शितोळे, सातारा शहर पोलीस ठाण्याचे डीबीचे पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम अशा 20 अधिकाऱयांसह 200 पोलीस कर्मचाऱयांनी सहभाग नोंदवला होता.
या कोंबींग ऑपरेशनमध्ये अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी प्रतापसिंहनगराचा आढावा घेवून नकाशा व तेथील गुन्हेगारांचे अड्डय़ाबाबत इत्थंभूत माहिती देवून मार्गदर्शन केले. नाकाबंदी करुन पथके थेट नगरात सर्चिंग करण्यात आले. या ऑपरेशनमध्ये 13 माहिती असलेले गुन्हेगार तपासले. रेकॉर्डवरील 22 आरोपी व 4 आरोपी तपासण्यात आले. तसेच सातारा परिसरातून तडीपार केलेले व तडीपार होवून सातारा हद्दीत राहणाऱया 9 जणांची तपासणी करण्यात आली. त्यांच्यावर महाराष्ट्र पोलीस अधीनियम 124 प्रमाणे 5 गुन्हे दाखल करण्यात आले. हे गुन्हे इरिगेशन विभागातील निवासस्थानांच्या साहित्यांची चोरी केल्याच्या अनुषंगाने असुन चोरी केलेले दरवाजे, खिडक्या असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या कारवाईमध्ये 21 दुचारी हस्तगत केल्या असून कागदपत्रांची तपासणी सुरु आहे. तसेच प्रतापसिंहनगरात आढळून न आलेल्या चार जणांना वॉरंट बजावण्यात आले. तर पंधरा जणांना समन्स बजावण्यात आले. प्रतापसिंहनगरातील माहितीगार गुन्हेगारांना पकडून त्यांच्या हालचाली पडताळण्यात आल्या आहेत. त्यांच्यावर पोलीस लक्ष ठेवून आहेत.
प्रतापसिंहनगरात जायला पोलीस घाबरायचे
एकेकाळी प्रतापसिंहनगरात पोलीस जायला भित असायचे. येथील गुन्हेगार व नागरिक पोलिसांना वेढा टाकायचे. येथील गुन्हेगार दत्ता जाधव, त्याचा भाऊ युवराज जाधव, त्याचा मुलगा लल्लन यांची दहशत प्रतापसिंहनगरपासून ते एमआयडीसी परिसरात चांगलीच होती. दत्ता जाधव याचे कारनामे सातारा पोलिसांना माहिती असूनही कारवाई होत नव्हती. परंतु तत्कालिन पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी याच झोपडपट्टीतील खंडय़ा नामक गुन्हेगाराला मोक्का लावला. त्यापाठोपाठ दत्ता जाधव, युवराज जाधव या दोघा भावांवर कारवाई केली. लल्लनवरही कारवाई केली. त्यामुळे हळहळू प्रतापसिंहनगरातील पोलिसांना नगरात जावू लागले. गुन्हेगारांची माहिती घेवू लागले.
रात्रीच्या कोंबिग ऑपरेशनमध्ये पोलिसांनी सगळी झोपडपट्टी पिंजून काढली. घर न घर शोधून काढले. त्यामध्ये औद्योगिक वसाहतीत चोरी केल्याचे साहित्य पोलिसांना मिळून आले. तब्बल पाच गुन्हे नव्याने दाखल झाले असून संशयित अशा 12 जणांना ताब्यात घेण्यात आले. 21 दुचाकी चोरीच्या असल्याच्या संशयावरुन पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत.
पोलिसांचा सायरन अन् गर्दी पाहून आख्खं नगर रात्रभर जागं
लॉकडाऊननंतर गुह्याच्या संख्येत वाढ झाल्याने गुन्हेगारांना अभय हे प्रतापसिंहनगरातच मिळू शकते हा अंदाज व्यक्त करुन सातारा पोलीस दलाने अचानकपणे रात्री प्रतापसिंहनगराला चारी बाजूने वेढा दिला. 200 पोलीस आणि 25 अधिकारी नगरात सायरन वाजवत घुसल्याने नगरात जेथे जेथे चुकीचे काम चालते, रात्रीचे चुकीचे काम चालते त्यांची तर चांगलीच तंतरली होती. पोलिसांनी प्रत्येक घरात अगदी किचनपर्यंत जावून तपासणी केली. त्यामुळे अख्खं प्रतापसिंहनगर जागं होतं. पोलिसांची एकदम एवढी संख्या पाहून नगरातील मी मी म्हणणाऱयांची भितीने गाळण उडाली होती.
काही गुन्हेगारांनी काढला पळ
सातारा पोलीस दलातील काही पोलीस आणि प्रतापसिंहनगरातील गुन्हेगार यांचे कनेक्शन वारंवार उघड झाले आहे. सातारा पोलीस दलाचे कोंबीग ऑपरेशन प्रतापसिंहनगरात आहे याची माहिती काही पोलिसांतील टिपरांकडून प्रतापसिंहनगरातील आश्रयित असलेल्या गुंडांना त्याची माहिती दिली गेल्याने गुंडांनी तेथून पळ काढल्याची प्रतापसिंहनगरात जोरदार चर्चा सुरु होती. तसेच काही गुंडांनी चोरीचा मालही लपवून ठेवल्याची चर्चा रंगत होती.
भंगार चोरी टोळीच्या म्होरक्याला मोक्का लावा
सर्वसामान्य प्रतापसिंहनगरवासियांना वेठीस धरु नका. नगरातील काही मोजकीच मंडळी वाममार्गाला आहेत. त्यांच्यावर कारवाई करायचे सोडून पोलिसांनी सर्वच प्रतापसिंहनगराला वेठीस धरले. एरिगेशन कॉलनीत चोरी करणाऱया टोळीच्या म्होरक्यावर मोक्का लावण्यात यावा, भंगार शेठवर कारवाई करायचे सोडून प्रतापसिंहनगरात आता शिक्षण घेत आहेत, कोणी वकील, कोणी शिक्षक, कोणी पोलीस बनत आहे, असे असताना चुकीच्या पद्दतीने प्रतापसिंहनगरवासियांना वेठीस धरणे चुकीचे आहे, अशी प्रतिक्रिया रिपाइंचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांनी दिली.









