मराठा आरक्षण स्थगिती केंद्राच्या मुळावर; दाखलेच बंद झाल्याने अडीचशे केंद्रचालक हवालदिल
प्रवीण देसाई/कोल्हापूर
मराठा आरक्षण स्थगितीचा परिणाम जिल्ह्यातील महा-ई-सेवा केंद्रचालकांवर झाला आहे. एकूण दाखल्यांच्या तुलनेत ८० टक्के प्रमाण हे मराठा दाखल्यांचे आहे. हेच दाखले बंद झाल्याने याचा फटका जिल्ह्यातील सुमारे अडीचशे केंद्रचालकांच्या उत्पन्नाला बसला आहे.
गेल्या वर्षभरापासून मराठा आरक्षणाचा लाभ मराठा समाजातील विद्यार्थी व तरुणांना झाला आहे. हे लाभ मिळण्यासाठी एस. ई. बी. सी. चे म्हणजेच मराठा आरक्षणाचे दाखले महत्वपूर्ण आहेत. हे दाखले महा-ई-सेवा केंद्रातून तयार होऊन प्रांताधिकारी यांच्या सहीने दिले जायचे. एका प्रांताधिकारी कार्यालयाच्या स्तरावर दररोज जवळपास दीडशे ते दोनशे जिल्ह्यातील चार प्रांताधिकारी कार्यालयातून सुमारे ७०० ते ८०० मराठा दाखले देण्याचे प्रमाण होते. विविध शैक्षणिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेशाकरिता जून-जुलै महिन्यात हे दाखले काढण्यासाठी मराठा विद्यार्थी व तरुणांची लगबग असायची. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे मराठा दाखले काढण्याची धावपळ सप्टेंबरपर्यंत सुरु होती. परंतु ९ सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली. त्यामुळे हे दाखले देण्याची प्रक्रियाच ठप्प झाली.
याचा फटका जसा मराठा समाजातील विद्यार्थी युवकांना बसला तसा जिल्ह्यातील सुमारे अडीचशे महा-ई-सेवा केंद्रचालकांना ही बसला आहे. दररोज तयार करण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या शंभर टक्के दाखल्यांपैकी पैकी ८० टक्के दाखले हे मराठा समाजाचे होते. आता फक्त उत्पन्न व डोमेसाइलचेच दाखले दिले जात आहे. त्याचे प्रमाण साधारण २० टक्के इतके आहे. मराठा दाखल्यांमुळे यापूर्वी असणारे दिवसाचे सरासरी २०० दाखल्यांचे प्रमाण आता २० ते २५ वर आले आहे. यामुळे मराठा आरक्षण स्थगितीचा परिणाम केंद्र चालकांवर झाला असून त्यांच्यासमोर उदर्निर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
मराठा आरक्षण स्थगितीचा परिणाम महा-ई-सेवा केंद्रचालकांवर झाला आहे. मराठा दाखल्यांचे प्रमाण मोठे होते. हे दाखले बंद झाल्याने जवळपास ८० ते ९० टक्के काम कमी झाले आहे. यामुळे केंद्रचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. – पिराजी संकपाळ, जिल्हाध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा महा-ई-सेवा केंद्रचालक संघटना
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









