नवी दिल्ली / वृत्तसंस्था
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची शुक्रवारी सकाळी अचानक प्रकृती बिघडली. त्यानंतर त्यांना दिल्लीतील लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. छातीत दुखू लागल्यामुळे राष्ट्रपतींना इस्पितळात दाखल व्हावे लागले होते. तथापि, त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती लष्कराच्या रुग्णालयाने बुलेटिनद्वारे दिली आहे. ‘राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना छातीत दुखत असल्याने शुक्रवारी सकाळी नवी दिल्लीतील लष्करी रुग्णालयात आणले गेले होते. नियमित तपासणी केल्यानंतर आता त्यांची प्रकृती स्थिर आहे’, असे बुलेटिनमध्ये नमूद करण्यात आले आहे.









