होसूरसह परिसरातून कुतूहल व्यक्त : पुरातत्व विभागाकडून संशोधनाची गरज
विनायक पाटील /कुदनूर
महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या सीमेजवळ होसूर (ता. चंदगड) येथे सुरु असलेल्या बांधकामाच्या प्रकल्पात विविध आकाराचे शेकडो दगडी खांब आढळलेले असून, याबद्दल परिसरातून कुतूहल व्यक्त केले जात आहे. तर लाव्हा रसातून अशाप्रकारच्या दगडांची उत्पत्ती झाली असावी, अशी काही जाणकारांकडून माहिती दिली जात आहे. मात्र, पुरातत्वच्या ठोस संशोधनातूनच या दगडांबाबत खरा उलघडा होऊ शकणार आहे.
चंदगड तालुक्यापासून पूर्वेकडे महाराष्ट्र राज्याच्या हद्दीतील होसूर गावापासून काही अंतरावर कोवाड-बेळगाव मार्गालगत एका बांधकाम प्रकल्पाचे काम सुरु आहे. दादा डेव्हलपर्स यांच्याकडून सुमारे अकरा एकरच्या या परिसरात हे काम सुरू असून, यामध्ये विविध आकाराचे दगड आढळून आले आहेत. यात आठ ते पंधरा फुट अशा आकाराच्या लांबींची दगड सापडले असून, दंडगोलाकार खांबांसारख्या दगडांबाबत या मार्गावरून ये-जा करणाऱयांकडून कुतूहल व्यक्त केले जात आहे.
दगडातून निघतोय घंटा नाद
दंडगोलाकार असलेले हे दगड कुतुहलाचा विषय बनले असून, या दगडांवर दुसऱया दगडाने मारा केल्यास त्यातून एकप्रकारचा घंटा नाद निघत आहे. परिसरातून अशाप्रकारच्या नैसर्गिक देणगीची पाहणी होताना दिसत आहे. त्याचबरोबर या आश्चर्यचकित करणाऱया दगडांबाबत चर्चाही होत आहे. मात्र, या दगडांबाबत पुरातत्व विभागाकडून संशोधन होण्याची मागणी केली जात आहे.
मंदिर बांधकामासह मूर्तींसाठी दगडांचा वापर
पूर्वीच्या काळात मंदिर बांधकामासाठी काळ्या दगडाचा वापर होत असे. हेमाडपंथी बांधकामात विशेषतः येथे आढळलेल्या यासारख्या दंडगोलाकार दगडातून मंदिराचे खांब केले जायचे असे काहीं जुन्या लोकांकडून सांगितले जात आहे. याचबरोबर मूर्ती किंवा काही दगडी रेखीव कामासाठीही अशा दगडांचा वापर करण्यात येई असेही बोलले जात आहे.
पुरातत्व विभागाने संशोधन करण्याची गरज…
आम्ही काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्याच्या हद्दीतील होसूर गावानजिक बांधकाम प्रकल्पाचे काम सुरू केले आहे. या कामामध्ये आम्हाला विविधप्रकारे दगड आढळून आले असून, अनेकांकडून या दगडाबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आमची मागणी आहे की या दगडांची पुरातत्व विभागाकडून पाहणी करून संशोधन करावे आणि हे दगड वापरण्याबाबतची खात्री करावी.
– सुरेश घाटगे, दादा डेव्हलपस









