महामुनी शुकदेव परिक्षिती राजाला पुढील कथा सांगतात.
मणि दाखवीं सभास्थानीं । स्नेह वाढवीं बंधुजनीं। विकल्पाची निरसीं रजनी । भेदभानीं प्रापक जे।येचि समयीं अक्रूरापासीं । कृष्णें मनि दिधला ऐसी । शंका नुपजेचि कोण्हासी । कारण ये विशीं अवधारिं । सुवर्णवेदिकामंडित मख ।संतत यजिले तां सम्यक । तें धन प्रसवे स्यमंतक । हेतु प्रत्यक्ष हा येथें ।तस्मात् वसतां वाराणसीं । स्यमंतक होता तुजचिपासीं । परिहार न करितां हें सर्वांसी। प्रत्ययासि प्रकाशक । प्रेमळ तूं आमुचा इष्ट । अवंचक सत्य स्वधर्मनि÷ । इष्टांमाजि विकल्प कष्ट । ते तां स्पष्ट निरसावे ।
कृष्णाने अक्रूराला विनंती केली – अक्रूरकाका! आपणापाशी असलेला स्यमंतकमणी आपण या सभास्थानी दाखवून आमच्या बांधवांच्या मनातील शंका दूर करा. शंकेमुळे संशय बळावतो. तो संशय पुढे बांधवांमध्येच वितुष्ट निर्माण करतो. त्यांच्यामध्ये भांडण लावून देतो. कुटुंब कलहाला कारणीभूत होतो. आपण या स्यमंतकमण्याने दिलेल्या सुवर्णाने काशीत सोन्याची वेदी बनवून यज्ञ करीत आहात. आपण आता कुटुंब कलह निवारणार्थ तो स्यमंतकमणी सर्वांना दाखवावा अशी माझी आपल्याला प्रार्थना आहे.
ऐसा कृष्णें आपुल्या मुखें । सामोपचारें मधुर वाक्मय । प्रार्थिला असतां श्वफल्कतोकें । दीर्घविवेकें विचारिलें । मिथ्याभिशापनिरसना । मणिदर्शन करी स्वजना । दुर्धर मिषें प्रत्यर्पणा ।निरभिलाषता सूचविली ।एवं मणिदर्शनीं कांहीं । कृष्णें दूषण माझ्या ठायीं । न लाविलें हें जाणोनि हृदयें । मणि ते समयीं उघडिला । वस्रे आच्छादिला होता । तो ते समयीं जाला देता । सूर्यासमान प्रभाढ्यता । भासे तत्वता रविवलय ।
कृष्णाने अत्यंत नम्रपणे, मधुर भाषण करून अक्रूराला जी विनंती केली होती त्याचा अक्रूराने मनोमन विचार केला. कृष्णाने अक्रूरावर कोणताच आरोप केला नव्हता आणि स्यमंतकमणी अक्रूराने आपल्यापाशीच ठेवावा अशी इच्छा प्रकट केली होती. आता स्यमंतकमणी अक्रूरापाशी आहे हे लोकांना स्पष्टपणे दिसले तरी अक्रूराचे त्यापासून काहीच नुकसान होणार नाही याची त्याला खात्री पटली. उलट आपण गृह कलह टाळू शकू असेही त्याला वाटले. त्याने कृष्णाची विनंती मान्य केली. वस्त्रात लपवून ठेवलेला तो सूर्यासारखा तेजस्वी प्रकाशमान स्यमंतकमणी त्याने बाहेर काढला व कृष्णाकडे दिला. सभास्थानीं गोत्रजांप्रति । मणीतें दावूनि ऐसिया रीती । मिथ्याभिशापाची दुरुक्ति। आपुली श्रीपति प्रक्षाळी । मणिदर्शनें दूषणरज । आपुलें क्षाळूनि अधोक्षज । पुढती स्यमंतक तेजःपुंज। अर्पिला सहज अक्रूरातें । प्रभु समर्थ श्रीगोविंद। यथार्थ केला पूर्वानुवाद । मणिदर्शनें क्षाळिला बाध । तैं निरपराध हरि कळला । कृष्णवाक्मय ।। सभास्थानीं। प्रकट केला स्यमंतकमणि । त्यातें देखतां सर्वां नयनीं। झांपडी पडिली बहुतेजें । कृष्णाने तो स्यमंतकमणी आपल्या बांधवांना दाखवून आपल्यावर आलेला आळ दूर केला. त्याचे तेज पाहून अनेकांच्या डोळय़ांची झापडे बंद झाली. मग कृष्णाने तो मणी अक्रूराला परत दिला.








