प्रतिनिधी/ सातारा
सातारा शहरात अनेकांवर नगरसेवकांची कृपादृष्टी असल्याने रस्त्याकडेला टपरी टाकून थाटमाट सुरु असतो. अशांवर कारवाई करण्यासाठी सातारा पालिकेचा अतिक्रमण हटाव विभाग आता तत्पर झालाय. गेल्या दोन दिवसांपासून शहरात कारवाई सुरु करण्यात आलेली आहे. शहरात रविवारी सकाळी कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, कासट मार्केटमध्ये परप्रांतियांची वाढत चाललेली अतिक्रमणे हटवण्यात येणार असल्याचे अतिक्रमण विभागातून सांगण्यात आले.
मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्या आदेशानुसार कारवाया सुरू झाल्या आहेत. साताऱयातल्या अतिक्रमणावर पालिकेच्या सभेत चर्चा रंगली अन् सभेमध्येच मुख्याधिकाऱयांनी अतिक्रमण हटावच्या टीमला कारवाईचे आदेश दिले. आदेश मिळाल्यानंतर अतिक्रमण हटावचे पथक कामाला लागले. गेल्या दोन दिवसांपासून कारवाई सुरु आहे. ही कारवाई जेथे जेथे नगरसेवकांच्या कृपेने अतिक्रमणे झालेली आहेत. तेथे तेथे कारवाई करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. अगदी ठाण्यामध्ये जशी कल्पिता पिंपळे यांनी मोहिम राबवली तशी कारवाई सातारा पालिकेचा अतिक्रमण हटाव विभाग राबवणार आहे. पाठीमागे कारवाई सतत केली जाते म्हणून एका फळ विक्रेत्यांने अतिक्रमण हटावचे अधिकारी प्रशांत निकम यांच्या डोक्यात वजनकाटा घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यावर निकम हे खचले नाहीत. एका नगरसेवकानेच हे प्रकरण मिटवण्यासाठी अगदी आघाडीच्या नेत्यांपर्यंत बैठका घडवून आणल्या. तसेच अतिक्रमण हटावचे पथक एकदा बापट साहेबांचा आदेश मिळताच कामाला वेगाने सुरुवात करतो. कासट मार्केट परिसरातील अतिक्रमणे हटवण्यात येणार आहेत. मग तेथे कोणाची मुलाहिजा करण्यात येणार नाही. परप्रांतियांना टपऱया टाकून देवून कोण मासिक दहा हजार रुपये भाडे घेत असेल तर पालिका ते खपवून घेणार नाही, असेही अतिक्रमण हटाव विभागातून सांगण्यात आले.









