बेळगाव येथील प्रकार, चौघा जणांना अटक
प्रतिनिधी/ बेळगाव
सशस्त्र दलाच्या (डीएआर, सीएआर) पोलीस भरतीसाठी रविवारी पात्र उमेदवारांसाठी लेखी परीक्षा आयोजित केली होती. बेळगावातील दोन परीक्षा केंद्रांत एकाच्या नावाने दुसऱयाने परीक्षा लिहिल्याचे उघडकीस आले असून या प्रकरणी चौघा जणांना अटक करण्यात आली आहे.
बोगस परीक्षार्थ्यांमुळे एकच खळबळ माजली आहे. यासंबंधी बेळगाव ग्रामीण व टिळकवाडी पोलीस स्थानकात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून गोकाक तालुक्मयातील चौघा जणांना अटक झाली आहे. पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन यांनी ही माहिती दिली आहे.
रविवारी झालेल्या सीईटी परीक्षेसाठी 6 हजार 909 उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यापैकी 5 हजार 760 जण लेखी परीक्षेसाठी हजर राहिले. 1 हजार 149 जण परीक्षेसाठी गैरहजर राहिले, अशी माहिती पोलीस आयुक्तांनी दिली आहे. बेळगाव शहरातील वेगवेगळय़ा कॉलेजमध्ये या परीक्षा झाली. यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातील जैन कॉलेजमध्ये एकाच्या नावाने दुसऱयानेच परीक्षा लिहिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मंजू निंगाप्पा कट्टीकर (वय 22) रा. राजापूर, ता. गोकाक याला अटक करण्यात आली आहे. बेळगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक सुनीलकुमार नंदेश्वर पुढील तपास करीत आहेत.
तर टिळकवाडी पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातील वसंतराव पोतदार पॉलिटेक्निकमध्ये झालेल्या परीक्षेतही एक बोगस परीक्षार्थी आढळून आला. या प्रकरणी टिळकवाडीचे पोलीस निरीक्षक विनायक बडीगेर व त्यांच्या सहकाऱयांनी मल्लापूर पी. जी., ता. गोकाक येथील तिघा जणांना अटक केली आहे. रात्री उशिरापर्यंत त्यांची चौकशी सुरू होती.
कृष्णा रामचंद्र ऐहोळे (वय 21) रा. मल्लापूर पी. जी., रोहन शंकर जोडट्टी (वय 20), त्याचे वडील शंकर बाळाप्पा जोडट्टी (वय 43) अशी अटक करण्यात आलेल्या तिघा जणांची नावे आहेत. रोहनसाठी परीक्षा लिहिताना कृष्णाला अटक झाली आहे. या दोन्ही प्रकरणांची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून रात्री उशिरापर्यंत तपास सुरू होता.









