प्रतिनिधी / कोल्हापूर
भाऊ बंदकीतील वाद मिटविण्याकरीता 20 हजारांची लाच घेताना शाहुवाडी पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक धनाजी हरी सराटे (वय 45, मुळ रा. देवाळे, ता. पन्हाळा, सध्या रा. चनवाड रोड, शाहुवाडी) याला लाचलुचपत प्रतिबंध विभागाने शुक्रवारी दुपारी रंगेहाथ पकडून अटक केली. ही कारवाई कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंध विभागाने केली.
तक्रारदारच्या साडूचे त्यांच्या भाऊबंधानशी भांडण झाले होते. याप्रकरणी शाहुवाडी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. या गुह्याचा तपास पोलीस नाईक धनाजी सराटे (बक्कल नंबर-1614) करीत आहेत. या दाखल गुह्याच्या तपासकामात मदत करण्यासाठी सराटे याने त्याच्याकडे 30 हजार रुपयांची मागणी केली. या मागणीबाबत कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करण्यात आली. या दाखल तक्रारीची लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पोलीस अधिकाऱयांनी पडताळणी केली. या पडताळणीमध्ये सराटेने लाच मागितल्याचे समोर आले. त्यावरुन शुक्रवारी दुपारी सापळा लावण्यात आला. त्यावेळी मागणी केलेल्या 30 हजार रुपयापैकी तडजोडीअंती 20 हजार रुपये स्विकारताना त्याला लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पोलीस अधिकाऱयांनी पकडून अटक केली.
या कारवाईत पोलीस उपाधीक्षक आदिनाथ बुधवंत, हवालदार मनोज खोत, पोलीस नाईक विकास माने, नवनाथ कदम, कॉन्स्टेबल मयूर देसाई आदीच्या पथकांने भाग घेतला.