म. ए. समिती कार्यकर्त्यांना स्थानबद्ध करण्याचा प्रयत्न : मराठी भाषिकांमधून संताप

प्रतिनिधी /बेळगाव
काळय़ादिनामित्त आयोजित करण्यात आलेल्या धरणे आंदोलनासाठी जाणाऱया कार्यकर्त्यांची जागोजागी अडवणूक करण्यात येत होती. यामुळे कार्यकर्ते व पोलिसांमध्ये वादावादीचे प्रकार घडत होते. तर समितीचे पदाधिकारी व नेत्यांना स्थानबद्ध करण्यासाठी पहाटे 4 वाजल्यापासून त्यांच्या घरांसमोर बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या धरणे आंदोलनातही पोलिसांची दडपशाही सुरू असल्याने कार्यकर्त्यांमधून संताप व्यक्त करण्यात येत होता.
गोगटे सर्कल येथून मराठा मंदिरकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला होता. तसेच गोवावेस येथील स्विमिंग पूलनजीक एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आली होती. काळे कपडे परिधान करून गोवावेस येथे येणाऱयांची चौकशी करण्यात येत होती. तसेच त्यांना तुमचे काय काम? असे सांगून माघारी धाडण्यात आले.
मराठा मंदिर समोरही अशाच प्रकारे कार्यकर्त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न सुरू होता. धरणे आंदोलन ठिकाणी कार्यकर्ते पोहचू नयेत यासाठी पोलिसांकडून दमदाटी करण्यात येत होती. रस्त्यांवर थांबणाऱया कार्यकर्त्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू होते.
स्थानबद्ध करण्याचा प्रयत्न
महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते व कार्यकर्ते धरणे आंदोलन करू नये यासाठी त्यांच्या घरासमोर पोलीस पाठविण्यात आले. शुभम शेळके यांच्या घरासमोर सकाळी 4 वाजता पोलीस दाखल झाले. तुम्हाला आंदोलनाला जाण्याची काय गरज? असा प्रश्न पोलिसांकडून विचारण्यात येत होता. त्यांना न जुमानता शुभम हे मराठा मंदिर येथे उपस्थित राहिले. रामलिंगखिंड गल्ली येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयालाही पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
उपचारासाठी आलेल्यांचीही अडवणूक
गोवावेस येथे उपचारासाठी आलेल्या महाराष्ट्रातील वाहनांचीही अडवणूक करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात आला. वादावादीनंतर उपचारासाठी आलो आहोत याची कागदपत्रे दाखविण्यात आल्यानंतर त्यांना सोडण्यात आले. या प्रकारांमुळे पोलिसांकडून केवळ मराठी भाषिकांना त्रास देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसून आले.









