अचूक बातमी “तरुण भारत”ची, शनिवार 24 जुलै 2021, सकाळी 10.30
●सातारा, कराड अजून तीन अंकी आकड्यामध्येच ●बाधित अन् मुक्तीचे प्रमाण समान ●कोरोनामुळे मृत होणाऱ्यांची संख्या घटली ●नवा आदेश न काढल्याने परिस्थिती जैसे थेच
सातारा / प्रतिनिधी :
जिल्ह्यातील बाधित होण्याचे प्रमाण कमी होत आहे. काल शुक्रवारी दिवसभरात 11685 जणांचे नमुने तपासणी केले आहेत. त्यामध्ये 889 जण बाधित आढळून आले. जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट 7.61 एवढा असून शुक्रवारी सायंकाळी उशिरा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी नवा आदेश काढला नाही. त्यामुळे परिस्थिती जैसे थेच आहे.
बाधितांचे सातारा, कराडमध्ये प्रमाण जास्त
जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या कराड आणि सातारा या दोन तालुक्यात सर्वाधिक आहे. कराड तालुका आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सातारा तालुक्यात बाहेरून उपचारासाठी येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे सातारा तालुक्यातील बाधितांचा आकडा कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. सातारा शहरात ऍक्टिव्ह रुग्णसंख्या आटोक्यात येत आहे. नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण झाल्याने सातारा शहरातील नागरिक आता स्वयंस्फूर्तीने लक्षणे दिसताच कोरोनाची तपासणी करून घेत आहेत. बाधित अहवाल येताच स्वतःच रुग्णालय वा कोविड सेंटरमध्ये दाखल होत आहेत. प्रत्येकजण स्वतःची काळजी घेत असून असे असताना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी किमान या शुक्रवारी तरी जिल्हा खुला करण्याचा निर्णय घेतील अशी आशा लागून राहिली होती. मात्र, त्यांनी नवा आदेश काढला गेला नसल्याने परिस्थिती जैसे थेच आहे. मृताचे प्रमाण घटले असून पाटण तालुक्यात हे प्रमाण सर्वाधिक आहे. तसेच डिस्चार्ज होण्याचे आणि बाधित होण्याचे प्रमाण समान आहे.
कैलास स्मशानभूमीत पुन्हा नियोजन
कैलास स्मशानभूमीत जेथे कोरोना बाधित मृत्यू झालेल्यावर अंत्यसंस्कार केले जातात. त्या अग्निकुंडात पुराचे पाणी गेल्याने तेथेच वरच्या अग्निकुंडात नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली.
शनिवारपर्यंत एकूण नमूने 13,16,342, एकूण बाधित 2,13,323, घरी सोडलेले 1,99,594, मृत्यू -5122 उपचारार्थ रुग्ण-10022









