इटलीच्या वैज्ञानिकांची सूचना : विषाणू दूर होण्यास लागतो महिन्याचा कालावधी : जगात 2.59 कोटी रुग्ण
मुलांमध्ये सायलेंट कोविड-19 चा धोका
जगात कोरोना विषाणूची बाधा आतापर्यंत 2,59,32,052 जणांना झाली आहे. यातील 1,82,15,106 रुग्ण बरे झाले आहेत. तर 8,61,871 बाधित दगावले आहेत. कोरोनाबाधिताला विषाणू दूर करण्यासाठी किमान महिन्याचा कालावधी लागतो. तर सद्यकाळात 68 लाख 56 हजार 883 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. याच कारणामुळे पॉझिटिव्ह आल्याच्या महिन्यानंतर दुसरी चाचणी केली जावी. 5 निगेटिव्ह टेस्ट रिझल्टमध्ये एक चुकीची असते असे इटलीच्या वैज्ञानिकांनी म्हटले आहे.
मुलांच्या नाक, गळय़ात अनेक आठवडे राहू शकतो विषाणू : लोकांमध्ये संसर्ग फैलावण्याची भीती मुलांच्या नाक आणि गळय़ात अनेक आठवडय़ांपर्यंत कोरोना विषाणू राहू शकतो. या कालावधीत मुलांमध्ये कुठलीच लक्षणे दिसून न येण्याचीही शक्यता आहे. वॉशिंग्टनच्या चिल्ड्रन नॅशनल हॉस्पिटलच्या रिसर्चनंतर हा दावा करण्यात आला आहे. कोरोना विषाणू कशाप्रकारे स्वतःचा संसर्ग फैलावतो हे अध्ययनात दिसून आल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.
चाचणी व्याप्ती
संशोधकांनी हे अध्ययन दक्षिण कोरियात केले आहे. मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग गुपचुप पद्धतीने फैलावत आहे. 85 टक्के संक्रमित मुले त्यांच्यात लक्षणे दिसून येत नसल्याने चाचणीपासून दूर राहिली आहेत. कोविड-19 ची चाचणी केवळ लक्षणे दिसून येणाऱया मुलांचीच करण्यात आली आहे. असा प्रकार यापुढेही घडल्यास समुदायात लक्षणेरहित मुलांचे प्रमाण वाढत जाऊ शकते.
सीडीसीच्या दिशानिर्देशाला विरोध
अमेरिकेतील सर्वात मोठी आरोग्य संस्था सेंटर्स फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनचा (सीडीसी) विरोध होत असताना या संशोधनाचे निष्कर्ष समोर आले आहेत. लक्षणेरहित रुग्णांची चाचणी करण्याची गरज नसल्याचे सीडीसीने अलिकडेच नवे दिशानिर्देश प्रसिद्ध करत म्हटले होते. एखाद्या कोरोनाबाधिताच्या संपर्कात आले तरच चाचणी केली जावी असे संस्थेने सुचविले होते. सीडीसीच्या या निर्णयाला अमेरिकन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्सने धोकादायक पाऊल ठरविले आहे.
91 पैकी 38 मुले लक्षणेरहित
संशोधनानुसार दक्षिण कोरियात 18 फेब्रुवारी ते 31 मार्चदरम्यान 91 असिम्प्टोमॅटिक, प्री-सिम्प्टोमॅटिक आणि सिम्प्टोमॅटिक मुले आढळली होती, त्यांना कोरोना संसर्ग झाल्याची पुष्टी मिळाली होती. यातील 20 मुलांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आली नव्हती. ही मुले असिम्प्टोमॅटिक होती. 91 पैकी 18 मुले प्री-सिम्प्टोमॅटिक होती, म्हणजेच यांच्यात कुठलेच प्रारंभिक लक्षण दिसून आले नसले तरीही नंतर लक्षणे दिसून येण्याची शक्यता होती. तर उर्वरित मुलांमध्ये कोरोना संसर्गाची लक्षणे स्पष्टपणे दिसून आली. यात ताप, खोकला, अतिसार, पोटदुखी, चव किंवा गंध न समजणे यासारखी लक्षणे आढळली होती.
संसर्ग वाढण्याचा धोका
मुलांमध्ये लक्षणे दिसून न आल्याने पूर्ण समुदायात विषाणू फैलावू शकतो असे संशोधकांचे म्हणणे आहे. मुले एकत्र खेळत असतात आणि अनेक प्रकारच्या हालचालींमध्ये एकत्रितपणे ते सामील असतात.
जपान : औषध शोधल्याचा दावा

जपानमधील संशोधकांनी कोरोना संसर्गावरील उपचार शोधून काढल्याचा दावा केला आहे. आर्थरायटिसचे औषध एक्टेमराद्वारे उपचार होऊ शकतो असे त्यांनी म्हटले आहे. कोरोना संसर्गात सर्वात मोठी समस्या सायकोटिन स्टॉर्म असते. प्रोटीन्सचा एक समूह शरीरातील इम्युन सिस्टीम अत्यंत वेगवान किंवा मंद करत असल्याने जीव जाण्याचा धोका वाढत असतो. एक्टेमराद्वारे इम्यून सिस्टीमला योग्य पातळीवर ठेवले जाऊ शकते.
इटलीत संशोधन

इटलीच्या मोडेना अँड रेजियो एमिलिया विद्यापीठाच्या डॉ. फ्रान्सिस्को वेंतुरेली आणि त्यांच्या सहकाऱयांनी 1,162 रुग्णांवर अध्ययन केले आहे. यात कोरोनाबाधितांची दुसरी चाचणी 15 दिवसांनी, तिसरी 14 दिवसांनी आणि चौथी चाचणी 9 दिवसांनी करण्यात आली. यात पूर्वी निगेटिव्ह अहवाल आलेले पुन्हा पॉझिटिव्ह आढळून आल्याचे यात दिसून आले. सरासरी 5 जणांच्या निगेटिव्ह टेस्टमध्ये एकाचा अहवाल चुकीचा होता. अध्ययनानुसार 50 वर्षांपर्यंतच्या लोकांना 35 दिवस आणि 80 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकांना बरे होण्यासाठी 38 दिवस लागतात.
कोलंबिया : टाळेबंदी संपुष्टात

कोलंबियात कोरोना संकटामुळे लागू करण्यात आलेली टाळेबंदी शिथिल करण्यात आली आहे. तेथे आता हवाईप्रवास, शहरांतर्गत वाहतूक आणि अनावश्यक कामांसाठीही लोक घराबाहेर पडू शकतात. देशात दिवसभरात 8,901 नवे रुग्ण सापडले असून 389 जण दगावले आहेत. देशात आतापर्यंत 6.24 लाखांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. तर 20 हजारांहून अधिक बळी गेले आहेत. दक्षिण अमेरिकेत कोलंबिया हा तिसरा सर्वात पीडित देश ठरला आहे.
नेपाळ : समूह संसर्ग सुरू

राजधानी काठमांडू समवेत 12 जिल्हय़ांमध्ये समूह संसर्ग सुरू झाल्याचे नेपाळच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे. या 12 जिल्हय़ांमध्ये 73 टक्के ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. मोरांग, सुनसरी, धनुसा, महोतरी, परसा, बारा, रौतहत, सरलही, काठमांडू, ललितपूर, चितव आणि रुपनदेहि या जिल्हय़ांमध्ये संकट निर्माण झाले असून ते सर्व हॉटस्पॉट ठरले आहेत. नेपाळमध्ये आतापर्यंत 40 हजार 529 रुग्ण सापडले असून 239 जणांचा मृत्यू ओढवला आहे.
द. कोरिया : पाद्रीची क्षमायाचना

दक्षिण कोरियाच्या एका चर्चमधून कोरोनाचा फैलाव झाल्याने पाद्रीने माफी मागितली आहे. सारंग-जील चर्चचे पाद्री जून क्वांग-हुन यांना 16 दिवसांनी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. ते देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. देशात कोरोनाची दुसरी लाट याच चर्चमुळे फैलावली होती. ऑगस्ट महिन्यात चर्चशी संबंधित 1,083 बाधित सापडले आहेत. देशात आतापर्यंत 20 हजार 449 रुग्ण सापडले आहेत. तर 326 जणांना जीव गमवावा लागला आहे.
इस्रायल : 1,924 नवे रुग्ण

इस्रायलमध्ये दिवसभरात 1,942 नवे रुग्ण सापडले असून 18 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत 1 लाख 18 हजार 538 रुग्ण आढळले आहेत. तर 957 जणांना महामारीमुळे जीव गमवावा लागला आहे. देशात गंभीर रुग्णांची संख्या 414 असून 860 जण उपचार घेत आहेत. महामारीमुळे इस्रायलमध्ये बेरोजगारीत मोठी भर पडली आहे.
रशिया : 10 लाखापार

रशियात बाधितांचा आकडा 10 लाखांच्या पलिकडे पोहेचला आहे. दिवसभरात देशात 4,729 नवे रुग्ण सापडले असून 123 जणांना जीव गमवावा लागला आहे. देशातील बळींचा आकडा 17,299 झाला आहे. वाढती रुग्णसंख्या असूनही देशभरातील शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. परंतु सर्व मुले आणि शिक्षकांसाठी मास्क परिधान करणे तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे अनिवार्य आहे.
ऑस्ट्रेलियातही आर्थिक मंदी

कोरोना महामारीमुळे 30 वर्षांनी ऑस्ट्रेलियात आर्थिक मंदीची स्थिती उद्भवली आहे. जगातील सर्वात स्थिर अर्थव्यवस्थांपैकी एक असलेल्या ऑस्ट्रेलियाच्य जीडीपीत 1959 नंतरची सर्वात मोठी घट नोंदली गेली आहे. मागील 30 वर्षांमध्ये ऑस्ट्रेलिया अधिकृतपणे आर्थिक मंदीच्या चक्रात सापडला नव्हता. 2020-21 च्या पहिल्या तिमाहीत तेथे विकासदर 7 टक्क्यांनी घसरला आहे. लोकांना दिला जाणारा सामाजिक सहाय्यता लाभ वाढवून 41.6 टक्के करण्यात आला आहे. या मदतीमुळे महामारीला तोंड देणाऱया लोकसंख्येला दिलासा मिळू शकतो.









