वार्ताहर /केरी
सत्तरीतील पेळावदा रावण येथील पुराच्या पाण्याने खचलेल्या रस्त्याची दुरुस्ती पूर्ण करून रस्ता वाहतुकीस खुला केला आहे. सोमवारी सकाळी याची दुरुस्ती पूर्ण झाल्याने या मार्गावरून वाहतूक सुरू झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
नुकत्याच आलेल्या पुराच्या पाण्याने या पुलाचा रस्ता खर्चून त्याची माती पूर्णपणे वाहून गेली. त्यानंतर हा रस्ता वाहतुकीस पूर्णपणे बंद झाला होता. दरम्यान सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे येथे सलग गेले तीन दिवस दुरुस्ती काम करून याची तात्पुरती दुरुस्ती केली व रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत केला. हा रस्ता खचल्याने या भागातील नागरिकांचा इतर क्षेत्राची संपर्क तुटला होता.
दरम्यान, सार्वजनिक बांधकाम खात्याचे मुख्य अभियंता उत्तम पार्सेकर यांनी भेट देऊन या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी पावसाळा संपल्यानंतर या पुलाची नव्याने बांधणी करणार असल्याचे सांगितले. यावेळी कार्यकारी अभियंता विलास तांबोसकर, स्थानिक पंच सदस्य वासुदेव सावंत, वाळपई सार्वजनिक बांधकाम खात्याचे सहाय्यक अभियंता देवेंद्र वेलींगकर, कनिष्ट अभियंता झिलबाराव देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.









