ऑनलाईन टीम / मुंबई :
टीईटी परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणात राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष आणि राज्य परीक्षा परिषदेचा अतिरीक्त कार्यभार सांभाळणारे तुकाराम सुपे यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. शिक्षक पात्रता परीक्षेत परीक्षेत पैसे घेऊन उत्तीर्ण केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
पुणे पोलिसांच्या सायबर सेलने तुकाराम सुपे यांना टीईटी परीक्षा पेपरफुटीप्रकरणी गुरुवारी चौकशीसाठी बोलावले होते. चौकशीदरम्यान, काही धक्कादायक बाबी समोर आल्यानंतर रात्री उशीरा सुपे यांना अटक करण्यात आली. आज सुपे यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे.
काही दिवसंपूर्वीच म्हाडाच्या परीक्षेतील गैरव्यवहार समोर आल्यानंतर सर्व परीक्षा रद्द कराव्या लागल्या होत्या. भरती परीक्षेच्या कामाचे कंत्राट मिळालेल्या ‘जी. ए. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीस’ या कंपनीनेच पेपरफुटीचा प्रयत्न केल्याचे उघड झाल्यानंतर सहा जणांना अटक करण्यात आली. दरम्यान, या प्रकरणात अटक असलेला कंपनीचा संचालक डॉ. प्रीतिश देशमुख याच्या घरी टीईटी परीक्षेची ओळखपत्र सापडल्याने पुणे पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली.