न्याय नाही दिला तर तीव्र आंदोलन : किरण कांदोळकर
पेडणे ( प्रतिनिधी)
पेडणेत ट्रक मालक संघटनेचे आंदोलन सातव्या दिवशीही सुरुच आहे. उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर आणि सरकारने ट्रक मालक संघटनेच्या मागण्या लवकरात लवकर मान्य करुन न्याय द्यावा, नाहीतर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा गोवा फॉरवर्ड पक्षाचे कार्याध्यक्ष तथा माजी आमदार किरण कांदोळकर यांनी मंगळवार नईबाग पेडणे येथे दिला.
पेडण्यातील ट्रक मालक संघटनेतर्फे पुकारलेल्या आंदोलनाला आज सात दिवस पूर्ण झाले. मात्र सरकारने याकडे लक्ष दिलेले नाही. या आंदोलनाला विविध पक्षाच्या नेत्यांचा तसेच सामाजिक संघटनेचा पाठिंबा मिळत आहे. मंगळवारी सायंकाळी गोवा फॉरवर्ड पक्षाचे कार्याध्यक्ष किरण कांदोळकर यांनी या आंदोलकांना पाठिंबा देत उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर आणि सरकारी यंत्रणेवर कडाडून टीका केली. किरण कांदोळकर यांच्या सोबत पेडणे मतदारसंघाचे गोवा फॉरवर्डचे नेते ऍड. जितेंद्र गावकर आणि पेडणे ट्रक मालक संघटनेचे पदाधिकारी व ट्रक मालक उपस्थित होते.
पेडणेत उपमुख्यमंत्र्यांची दादागिरीः किरण कांदोळकर
यावेळी किरण कांदोळकर म्हणाले, पेडणेचे आमदार आणि उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांची पेडणेत दादागिरी सुरु असून स्थानिकांनी मडगावहून आलेल्या बाबूला डोक्मयावर घेतले. आता तेच त्यांना त्रास देत आहेत. पेडणेतील ट्रक मालक हे गेले सात दिवस शांतपणे आंदोलन करत आहेत. जरी सरकारचा मोपा विमानतळ कंपनी जी.एम.आरशी थेट संबध येत नसला तरी जी.एम.आर कंपनीच्या ठेकेदारांनी पेडणेतील मोपा विमानतळावर कामासाठी लावलेल्या ट्रकचा मोबदला हा थेट ट्रक मालकांना मिळत नसून मधले दलाल खात आहेत. हे दलाल बाबू आजगावकर यांचे एजेंट असून सरकारलाही हा मोबदला जात असल्याचा आरोप करत यात सरकारी यंत्रणाही सहभागी असल्याचा आरोप केला. धंदेवाले हे स्थानिक असून त्यांना न्याय मिळला पाहिजे अशी मागणी केली.
महाराष्ट्र राज्यातील ट्रक बेकायदेशीर रेती तसेच अन्य माल घेऊन पास नसताना गोव्यात वाहतूक करत असून या प्रकारणात सर्व सरकारी यंत्रणा सहभागी असल्याचा आरोप किरण कांदोळकर यांनी केला.
पेडणे तालुक्मयात येणाऱया माल वाहतूक करणाऱया ट्रक मालकांना आवाहन केले होते त्या आवाहनला उस्फूर्त प्रतिसाद लाभत असून स्वतःहून माल वाहू वाहनांच्या मालकांनी आपल्या गाडय़ा बंद ठेऊन ट्रक मालकांना आपला पाठिंबा जाहीर केला.
मोपा विमानतळ प्रकल्पात जे खडी, रेती आणि चिरे लागतात त्याची वाहतूक करण्यासाठी आम्हाला वाढीव दर देवून आमच्या ट्रकाना कामधंदा द्यावा. आमच्या मागण्या मान्य होत नसल्याने आता आंदोलन तीव्र करणार असल्याचा इशारा सातव्या दिवशी दिला.
उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी राजीनामा द्यावाः ऍड. जितेंद्र गावकर
उपमुख्यमंत्री हे पेडणेतील ट्रक मालकांच्या लहान मागण्या मान्य करु शकत नाही तर ते का पाहिजे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी गोवा फॉरवर्डचे नेते ऍड. जितेंद्र गावकर यांनी केली. पेडणेतील आमचे बंधू हे गेले सात दिवस आपल्या मागण्यासाठी आंदोलन करत असून ते आपल्या न्याय हक्कासाठी आंदोलन करत आहेत. मात्र उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री तसेच सरकारी अधिकारी यांनी याकडे साधा येऊन त्यांना भेटून प्रश्न सोडविण्यासाठी सौजन्य दाखविले नाही. उपमुख्यमंत्री एक दिवस ट्रक आंदोलन कर्त्यांना भेटायला आले व ट्रक मालकांना दरवाढ आपण देऊ शकत नाही माझ्याकडे ते काही नाही असे सांगितले. आज सात दिवस हे आंदोलन सुरू असून गुढी पाडवा व नवीन वर्ष आहे. या दिवशी उजेड असतो व चांगल्या गोष्टी केल्या जातात मात्र या ट्रक मालकांच्या जीवनात नवीन वर्षालाही अंधार आणला आहे, असे जितेंद्र गावकर म्हणाले.