सत्तरच्या दशकातले दिवस होते. आम्ही मुलांच्या शाळेतून आणि मराठी माध्यमातून अकरावी पास होऊन नुकतेच कॉलेजात गेलेलो होतो. तिथल्या मुक्त वातावरणात बुजलेलो. मुलींशी बोलायची कधीच सवय नव्हती. त्यामुळे वर्गातल्या एखाद्या मुलीनं आणि इंग्रजीतून-काही विचारलं तर दरदरून घाम फुटायचा. मग मराठीच येणाऱया-बोलणाऱयांचा छोटासा गट आपोआप बनला. कॉलेजला बरोबर येऊ-जाऊ लागलो. एकत्रच तास बुडवू लागलो.
प्रल्हाद उल्हास ऊर्फ पल्ल्या सीमावर जाम मरायचा. पण सीमापुढं थेट व्यक्त व्हायला अर्थातच घाबरत होता. आम्ही तास बुडवून आणि बसचे पैसे वाचवून घराजवळच्या अशोक हॉटेलमध्ये चहा पीत बसलो की तो आमच्या गप्पांमध्ये सामील न होता वहीच्या मागच्या पानावर सीमाचं नाव गिरवत राही.
एकदा रविवारी आम्ही सगळे मित्र अपोलोमध्ये ‘लव्ह मॅरेज’ सिनेमा बघायला गेलो होतो. देव आनंदचा पिक्चर असल्याने त्याचा पंखा असलेल्या प्रल्हादने चौघांचे तिकिटांचे पैसे भरले होते. ‘बाय चान्स’ अर्थात योगायोगाने सीमा आणि तिच्या दोन मैत्रिणी पण सिनेमाला आलेल्या दिसल्या. त्यांनी स्टेडिया बाल्कनीचं तिकीट काढलं होतं. अशक्त अर्थव्यवस्थेमुळे आम्ही फॅमिली सर्कलचं. आत गेल्यावर लक्षात आलं की त्यांच्यात आणि आमच्यात चारेक रांगांचंच अंतर आहे. त्यांनी आम्हाला बघितलेलं होतं की नाही ते समजलं नाही.
सिनेमा सुरू होईतो दोन तीनदा पल्ल्यानं उठून मागं बघितलं. पण त्यांचं त्याच्याकडे लक्ष गेलं नाही. सिनेमा सुरू झाल्यावर धमाल आली. देव आनंद आणि माला सिन्हा एकमेकांशी बोलू लागले की अंधारातून मित्र ओरडायचे, ‘प्रल्हाद, ए पल्ल्या.’ पल्ल्या चिडायचा.
सिनेमात ‘धीरे धीरे चल चांद गगन में’ गाणं चालू झाल्यावर मजा आली. पुढच्या रांगेतले म्हणजे डेस सर्कलमधले खूप जण शिट्टय़ा मारत होते. त्या गाण्यात देव आनंद खांदे आणि हातांच्या विचित्र हालचाली करीत दुडक्या चालीत मागेपुढे होतो. त्या वेळी एक मित्र जोरात ओरडला, ‘पल्ल्या नीट नाच, सीमा बघतीये.’ बाप रे. त्यानंतर प्रल्हाद घामाघूम झाला आणि खाली मान घालून बसला. थोडय़ा वेळाने हळूच उठला आणि तोंड लपवून बाहेर गेला तो परत आलाच नाही.
एक एकतर्फी प्रेम फुलण्याआधी कोमेजून गेलं. त्यानंतर बरेच दिवस पल्ल्या आमच्याशी बोलायचा बंद झाला.








