प्रतिनिधी / पेठ वडगाव
पेठ वडगाव पालिकेच्या एका अधिकाऱ्याला कोरोना झाल्याने तसेच प्रभाग सात मधील एका महिलेचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला. शहरात आज दोन कोरोना रुग्णांची भर पडली. यामुळे पालिका यंत्रणा खडबडून जागी झाली. आज दिवसभरात विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर पालिका मुख्याधिकाऱ्यांनी कारवाई सुरु केली असून कोरोना संसर्ग पुन्हा वाढू नये यासाठी नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन मुख्याधिकारी सुषमा कोल्हे यांनी केले आहे.
मुख्याधिकारी सुषमा कोल्हे व पालिका कर्मचारी यांनी बाजारपेठ, पालिकाचौक परिसरात विना मास्क फिरणार्या नागरीकांवर कारवाई केली. दरम्यान शहरात अनेक व्यापारी, व्यावसाईक कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी प्रशासनाचे नियम पाळत नसल्याने कोरोना संसर्ग पुन्हा वाढण्याची भीती नागरीकातून व्यक्त होत आहे.
शहरात पालिका चौक, एस.टी.बस स्थानक, पद्मा रोडवर विनाकारण रेंगाळत थांबणार्या नागरीकांमुळे बाजारात गर्दी होत आहे. तर पालिका प्रशासनाने लाइव्ह स्क्रीनवर महालक्ष्मी दर्शनासाठी दिलेल्या परवानगीमुळे चौकात गर्दी होण्याची शक्यता असल्याने पालिका व पोलीस प्रशासन यावर काय कारवाई करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. वडगाव शहरात एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३४७ झाली असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ३३३ आहे. उपचार सुरु असलेले ४ तर आज अखेर कोरोनाने मृत्यू संख्या १० आहे.
Previous Articleस्मिता ढोबळे यांची स्त्री शक्तिला अनोखी मानवंदना!
Next Article शहीद पोलिस स्मृती दिनानिमित्त अभिवादन









