प्रतिलिटर 1 रुपये वाढीचा सरकारचा निर्णय
प्रतिनिधी / बेळगाव
पेट्रोल, डिझेल आणि वीज दरवाढीपाठोपाठ आता दूध दरात वाढ करण्याचा विचार शासन करत आहे. इंधनाच्या दरवाढीमुळे वाहतूक महागली आहे. त्यामुळे सरकारने प्रतिलिटर 1 रुपये दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या दोन दिवसांत हा निर्णय लागू केला जाणार आहे. त्यामुळे दूध खरेदीदारांना 1 रुपये अधिक मोजावे लागणार आहेत.
पशुखाद्य, चारा आणि वाहतूक महागल्याने खर्च वाढला आहे. त्यामुळे दूध उत्पादक संघाने प्रतिलिटर दरामध्ये 5 रुपये वाढ करण्याची मागणी शासनाकडे केली होती. मात्र सामान्यांवर अधिक भार पडू नये, यासाठी शासनाने दूध दरात प्रतिलिटर 1 रुपयाने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत येत्या दोन दिवसात अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
कोरोनामुळे दोन वर्षांत दूध संघांना मोठा फटका बसला आहे. दरम्यान, दुधाची उचल थांबल्याने दूध पावडर आणि इतर उपपदार्थ बनविण्यात आले होते. त्यामुळे दूध उत्पादक संघांच्या अर्थकरणावर परिणाम झाला. आता सर्वकाही सुरळीत झाल्यानंतर वाढलेल्या महागाईमुळे दूध दरात वाढ करण्याचा प्रस्ताव शासनासमोर ठेवला आहे. त्यानुसार दूध दरात वाढ होणार आहे.









