प्रतिनिधी/ बेळगाव
गेल्या महिन्याभरात पेट्रोल व डिझेलचे दर दिवसागणिक वाढत चालले आहेत. वाढलेल्या पेट्रोल दरामुळे सर्वसामान्यांचे कंबरडेच मोडले आहे. एक तर कोरोनाच्या आजाराला लढा देत असताना पेट्रोल व डिझेलचे दर वाढविल्यामुळे सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे. असेच दर वाढत राहिल्यास महागाईचा भडका उडणार आहे. सर्वसामान्यांना वाहन चालविणे अवघड जाणार आहे. तेंव्हा तातडीने वाढवलेले दर केंद्र आणि राज्य सरकारने कमी करावेत, अशी मागणी वकिलांनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये पेट्रोलचा दर 40 डॉलर आहे. असे असताना देशामध्ये मात्र पेट्रोलचे दर वाढविण्यात आले आहेत. प्रतिलिटर दहा रुपये दर वाढविले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. कोरोनामुळे काम नाही. कोणताही व्यवसाय योग्य प्रकारे सुरू नाही. त्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. मात्र सरकारने अचानकपणे पेट्रोलचे दर अशाप्रकारे वाढविल्यामुळे जीवन जगणे मेटाकुटीचे झाले आहे.
पेट्रोल व डिझेलच्या दरावरच महागाई अवलंबून असते. हे दोन्ही दर वाढविल्यामुळे महागाई वाढू लागली आहे. त्यामुळे मध्यमवर्गीय व सर्वसामान्यांना आता झळा पोहोचू लागल्या आहेत. तेंव्हा तातडीने दर कमी करा, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी ऍड. आण्णासाहेब घोरपडे, ऍड. एन. आर. लातूर, ऍड. एम. एस. नंदी, ऍड. एस. आर. यडहळ्ळी, ऍड. बी. एम. बडगेर, ऍड. बी. एस. हिरेमठ, ऍड. शरद देसाई, ऍड. वाय. के. दिवटे, ऍड. एम. के. कांबळे, जोतिबा पाटील, ऍड. जे. डी. भाविकट्टी, ऍड. आय. एस. पाटील यांच्यासह वकील व नागरिक उपस्थित होते.









