आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दुचाकीवरून येऊन पंपावर भरले पेट्रोल : पेट्रोल पंपासमोरच केला केंद्र सरकारचा निषेध
प्रतिनिधी / बेळगाव
महागाईने उच्चांक गाठला असून पेट्रोल डिझेलसह सर्व जीवनावश्यक वस्तुंचे दर वाढल्याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी शुक्रवारी आंदोलन छेडले. हिंडलगा गणपती मंदिरानजिक असणाऱया पेट्रोल पंपावर त्यांनी दुचाकीवरून येऊन पेट्रोल भरले. त्यानंतर ती दुचाकी आडवी करून तिच्यावर पुष्पहार घातला व श्रद्धांजली अर्पण केली. कार्यकर्त्यांनीसुद्धा आपल्या दुचाकी आडव्या करून संताप व्यक्त केला.
यावेळी बोलताना आमदार हेब्बाळकर म्हणाल्या, खोटी आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या भाजपने अच्छे दिन नव्हे तर बुरे दिन दाखवले आहेत. या सरकारच्या कारकिर्दीत महागाईने उच्चांक गाठला असून पेट्रोल डिझेलसह सर्व जीवनावश्यक वस्तुंचे दर वाढले आहेत.
कोरोनाने लोकांना संकटात टाकले आहे. हॉस्पिटलचे बिल भरणे सामान्यांना कठिण झाले आहे. अशावेळी लोकांना दिलासा देण्याऐवजी पेट्रोल डिझेलसह सर्व दरवाढ करून सरकारने जखमेवर मिठ चोळले आहे. मनमोहन सिंग यांच्या काळात पेट्रोल 58 रुपये व डिझेल 45 रुपये लिटर असा दर होता. आज मात्र पेट्रोलने शंभरी गाठली आहे. त्यामुळे हे सरकार खोटी आश्वासने देऊन सत्तेवर आले आहे. अच्छे नव्हे तर बुरे दिन दाखवले आहेत.
पाच दिवस आंदोलन करणार
हे केवळ काँग्रेस पक्षाचे आंदोलन नाही तर जनसामान्यांचे आंदोलन आहे. लोकांच्या समस्या सरकारच्या डोळय़ांना दिसत नाहीत. कानांना ऐकू येत नाहीत. काँग्रेसवर आरोप करण्याचे बंद करून या सरकारने श्रीमंतांच्या ऐवजी सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यावर भर दिला पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.
इंधन दरवाढ आणि महागाई याच्या निषेधार्थ पुढील पाच दिवस ग्रामीण भागामध्ये आंदोलन छेडण्यात येणार आहे, असे यावेळी सांगण्यात आले.
दक्षिण ब्लॉक काँग्रेसच्यावतीने येळ्ळूर येथे निदर्शने
पेट्रोल, डिझेलचे दर वाढल्यामुळे महागाई गगनाला भिडली आहे. सर्वसामान्य जनता यामध्ये भरडली जात आहे. त्यामुळे जीवन जगणे कठीण झाले आहे. केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी देशभरात काँग्रेसने निदर्शने केली. दक्षिण ब्लॉक काँग्रेसच्यावतीनेही येळ्ळूर रस्त्यावरील पेट्रोल पंपाजवळ निदर्शने केली.
दक्षिण ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष किरण हणमंत पाटील यांनी केंद्र सरकारचा तीव्र शब्दात निषेध नोंदविला. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवून सामान्य जनतेचे कंबरडेच मोडले आहे. या वाढलेल्या दरामुळे जीवन जगणे कठीण झाले असून तातडीने हे दर कमी करावे. अच्छे दिन म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साऱयांनाच महागाईच्या खाईत ढकलले आहे. त्याचा आम्ही निषेध करत आहे. तातडीने दर कमी करावे, अन्यथा पुन्हा तीव्र आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला आहे.
यावेळी ग्राम पंचायत माजी सदस्य विजय इराप्पा कोरे, चांगाप्पा कुंडेकर, लक्ष्मण छत्र्याण्णावर, सत्त्यसेन किरण पाटील, प्रल्हाद पाटील, विनायक बेडके, नामदेव येळ्ळूरकर, सुधीर लोहार, राघवेंद्र सुतार, नारायण पाटील यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.









