ऑनलाईन टीम / मुंबई :
पेट्रोल-डिझेलचे दर नियंत्रण मुक्त करण्यात आल्याने आंतरराष्ट्रीय बाजारानुसार दररोज दरात वाढ होताना दिसत आहे. सद्य स्थितीत पेट्रोलचा दर 93 रुपये तर डिझेल 80 रुपये इतका आहे. यासोबत सिलिंडरच्या किमती ही आकाशाला भिडल्या आहेत. अशा प्रकारे केंद्र सरकारकडून सामान्य जनतेची चाललेल्या लुटी विरोधात शिवसेनेने मुंबईत आज विविध ठिकाणी आंदोलन केले.

मुंबईतील दादर, गिरगाव, भायखळा , वडाळा, वांद्रे याभागात मोठ्या संख्येने सेनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभागी होऊन केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी केली.
भायखळा भागातील आंदोलनात महापौर किशोरी पेडणेकर यांनी बैलगाडीत बसून या आंदोलनात इंधन दरवाढी विरोधात निषेध व्यक्त केला.
जालन्यात शिवसेनेकडून स्कुटीची अंत्ययात्रा काढण्यात आली. शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.
केंद्रसरकार हाय हाय ,मोदी सरकार मुर्दाबादच्या घोषणा देत नांदेड येथे शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडीचा धडक मोर्चा काढण्यात आला.
यावेळी कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात घोषणा दिल्या. अब की बार 100 पार, नरेंद्र + देवेंद्र = वसूली केंद्र यासोबतच केंद्र सरकार तुपाशी आणि ग्राहक मामा मात्र उपाशी! अशा घोषणा देत केंद्र सरकारचा तीव्र निषेध नोंदवला.








