उत्पादन शुल्कात 3 ते 6 रुपयांची वाढ करण्याचा विचार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात 3 ते 6 रुपयांची वाढ करण्याचा विचार केंद्र सरकार करीत असल्याचे वृत्त आहे. मात्र, याला अधिकृत दुजोरा देयात आलेला नाही. मात्र हा निर्णय झाल्यास या दोन्ही जीवनावश्यक वस्तूंच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. तथापि, हा निर्णय केवळ तशी आवश्यकता भासल्यासच घेण्यात येईल, अशी सूत्रांची माहिती आहे.
कोरोनामुळे अर्थव्यवस्था मंदावली असून सरकारच्या उत्पन्नावर विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे अधिक उत्पन्न मिळविण्यासाठी पेट्रोल-डिझेलच्या उत्पादन शुल्कात वाढ केली जाण्याची शक्यता आहे. तसा घेतला गेल्यास सरकारच्या तिजोरीत चालू वित्तवर्षाच्या उरलेल्या काळात आणखी 30 हजार कोटी रूपयांची भर पडू शकते. मात्र, सध्याच्या आव्हानात्मक काळात जनतेवर या वाढीव दराचा भार टाकायचा किंवा नाही यावर विचारमंथन सुरू असल्याचेही सांगण्यात येते.
किमती वाढणार नाहीत ?
या दोन वस्तूंच्या उत्पादन शुल्कात वाढ केली तरी किरकोळ विक्रीचे दर वाढण्याची शक्यता नाही, असेही मत व्यक्त होत आहे. कारण हे वाढीव शुल्क ग्राहकांकडून नव्हे, तर पेट्रोलियम कंपन्यांकडून संकलित केले जाते. याचाच अर्थ असा की या कंपन्यांचा फायदा कमी होतो. अशाच प्रकारे ग्राहकांवर अतिरिक्त भार न टाकता, उत्पादनशुल्कात वाढ करण्याचा सरकारचा विचार असल्याचे सांगण्यात येते. नेमके काय होणार हे निर्णय घेतल्यानंतरच समजणार आहे.









