पाकिस्तान सरकारचा निर्णय : विरोधकांकडून टीकास्त्र
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
पाकिस्तान सरकारने सर्व पेट्रोलियम उत्पादनांचे दर वाढविले आहेत. पेट्रोलचा दर 25.58 रुपये प्रति लिटरने (पाकिस्तानी चलनात) वाढविण्यात आला आहे. पाकिस्तानात पेट्रोल 100.10 रुपये प्रतिलिटर झाले आहे. तर डिझेल 21 रुपये प्रतिलिटरने महागले आहे. डिझेलचा दर 101.46 रुपये प्रतिलिटर झाला आहे. केरोसिनही 24 रुपयांनी महागले आहे.
नवे दर समोर येताच अनेक शहरांमधील पेट्रोलपंप बंद करण्यात आले आहेत. बहुतांश पेट्रोल पंपांवर तांत्रिक बिघाडाचे फलक झळकले आहेत. पेट्रोलियम उत्पादनांच्या दरवाढीवर विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला आहे.
इम्रान सरकारच्या अपयशामुळे देश दिवाळखोरीच्या उंबरठय़ावर आहे. तिजोरी भरण्यासाठी गरिबांना लूटण्याचा मार्ग योग्य नव्हे. ‘सिलेक्टेड’ पंतप्रधानांनी मनमानी न केली तरच उत्तम ठरणार असल्याचा इशारा पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी यांनी दिल आहे. तर इम्रान यांनी जनतेवर पेट्रोल बॉम्ब टाकला आहे. अन्य देश गरिबी संपविण्यावर लक्ष केंद्रीत करत असताना इम्रान खान सरकार गरिबांना संपवू पाहत असल्याचा आरोप पीएमएल-एनचे खासदार आसिफ किरमाणी यांनी केला आहे.
चलनाचे मूल्य
भारताचा एक रुपया पाकिस्तानच्या 2.22 रुपयांसमान आहे. म्हणजेच भारतीय चलनाचे मूल्य पाकिस्तानी चलनाच्या तुलनेत दुप्पटीपेक्षाही अधिक आहे.









