ऑनलाईन टीम / पॅरिस :
वॉशिंग्टन पोस्ट आणि द गार्डियनसह 16 माध्यम संस्थांनी संयुक्त अहवाल प्रसिद्ध केल्यानंतर ‘पेगासस’ सॉफ्टवेअरकडून होणाऱ्या हेरगिरीचा मुद्दा जगभरात उपस्थित केला जात आहे. फ्रान्स सरकारने पेगासस सॉफ्टवेअरद्वारे होणाऱ्या या कथित हेरगिरीच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
इस्रायली कंपनीच्या ‘पेगासस’ सॉफ्टवेअरने भारतातही जवळपास 300 मोबाईल नंबरची हेरगिरी केल्याचा दावा करण्यात आला आहे. ज्यामध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी, निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्यासह प्रमुख राजकीय नेते, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, 40 पत्रकार आणि काही अन्य लोकांचा समावेश आहे.
इस्रायली कंपनी ‘एनएसओ’ने पेगासस सॉफ्टवेअर विकसित केल्यानंतर विविध देशांमधील सरकारांना ते विकण्यास सुरुवात केली. 2013 मध्ये वार्षिक 40 दशलक्ष डॉलर्सची कमाई करणाऱ्या कंपनीची कमाई 2015 पर्यंत जवळपास चौपट होऊन 155 दशलक्ष डॉलर्स झाली. हे सॉफ्टवेअर खूप महाग आहे, त्यामुळे सामान्य संस्था आणि संस्था ते खरेदी करू शकत नाहीत.









