मार्केटिंग प्रतिनिधींचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी/ बेळगाव
पॅनकार्ड क्लबमध्ये आम्ही मार्केटिंग प्रतिनिधी म्हणून काम केले. सर्वसामान्य जनतेचे पैसे जमा करून त्यामध्ये गुंतवणूक केली. मात्र या कंपनीवर सीबीने बंदी घातली. यामुळे गुंतवणूकदारांची सर्व रक्कम त्यामध्ये अडकली आहे. आता गुंतवणूकदार आम्हाला नाहक त्रास देत आहेत. तेव्हा तातडीने सीबीने कंपनीची मालमत्ता विकून गुंतवणूकदारांची रक्कम परत करावी, अशी मागणी पॅनकार्ड क्लबच्या मार्केटिंग प्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पॅनकार्ड क्लबमध्ये मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक करण्यात आली आहे. गेल्या पाच-सहा वर्षांपासून ही कंपनी सीबीच्या कारवाईमुळे बंद झाली आहे. पॅनकार्ड क्लबची मालमत्ता विकून 90 दिवसांत रक्कम परत द्यावी, असे आदेश न्यायालयाने दिले होते. तरीदेखील सीबीने अजूनही त्याबाबत पाऊल उचलले नाही. यामुळे रक्कम मिळणे कठीण झाले आहे.
आम्ही रक्कम जमा करून ती कंपनीमध्ये गुंतवली आहे. त्यामध्ये आमचा कोणताही दोष नाही. मात्र, गुंतवणूकदार आमच्या घरी रक्कम मागण्यासाठी येत आहेत. याचबरोबर पोलीस स्थानकांमध्ये आमच्यावर फिर्यादही देत आहेत. तेव्हा याचा गांभीर्याने विचार व्हावा आणि आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी या निवेदनाद्वारे केली आहे.
शिरस्तेदार मंजुनाथ जानकी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी एस. बी. पाटील, डी. बी. पावशे, एन. आर. पाटील, एच. एल. डोळेकर, शिवाजी सुंठकर, सुनील जाधव, व्ही. एल. नंद्याळकर, श्रीधर पाटील, डी. एस. मुचंडी, आर. पी. पालनकर, आर. आर. कपिलेश्वरी, पी. जे. सांबरेकर, के. एम. चिकोर्डे, व्ही. जे. करगुप्पीकर, एम. एम. सांबरेकर उपस्थित होते..









