मतविभागणीमध्ये जिंकण्याची होती संधी, भाजपा पाचव्या स्थानी तर माजी आमदार एलिना साल्ढाना सातव्या स्थानावर
प्रतिनिधी /वास्को
कुठ्ठाळी मतदारसंघात भाजपाने आपले वर्चस्व आता हरवले आहे. कुठ्ठाळीकडे झालेले दुर्लक्ष किंवा पर्यायी नेतृत्व उभे करण्यास आलेले अपयश हेच कुठ्ठाळी गमावण्यामागचे कारण आहे. कुठ्ठाळीत निवडणुकीपूर्वीच भाजपाने हार मानली होती असे एकंदर परिस्थितीवरून दिसून आले. मतांच्या विभाजनात कुठ्ठाळी पुन्हा जिंकण्याची संधी भाजपाने गमावली. तर काँग्रेस यंदा चौथ्या क्रमांकावरून दुसऱया क्रमांकावर आली. त्यांच्या मतांची कमाई मात्र तेवढीच आहे.
दहा वर्षांपूर्वी कुठ्ठाळी मतदारसंघाची फेररचना झाल्यानंतर स्व. माथानी साल्ढाना यांच्या मदतीने भाजपाने या मतदारसंघात ऐतिहासिक विजय मिळवला होता. माथानींच्या अकाली निधनानंतर एलिना साल्ढाना यांनी या मतदारसंघाची धुरा सांभाळली. 2017 च्या निवडणुकीत त्या पुन्हा जिंकून आल्याने या मतदारसंघावर भाजपाची पकड मजबूत झाली होती. यंदा कुठ्ठाळी मतदारसंघात भाजपाला तिसऱयांदा निवडून येण्याची संधी होती.
मतविभागणीची संधी भाजपाने गमावली, अपक्ष उमेदवाराशीच जुळवून घेतले
मागच्या निवडणुकीप्रमाणेच यंदाही अनेक सक्षम उमेदवार कुठ्ठाळीच्या निवडणुक रिंगणात होते. परंतु नियोजन शुन्यतेचा परीणाम ही जागा गमावण्यात झाला. त्यांच्या माजी आमदार एलिना साल्ढाना पक्ष व सरकारविरूध्द सतत बोलत होत्या. त्यामुळे पक्ष त्यांना यंदाच्या निवडणुकीत त्यांना उमेदवारीची संधी देणार नाही असे मतदारांना जसे वाटत होते, तसे एलिना साल्ढाना यांनाही वाटल्याने त्यांनी पक्ष सोडून आपमध्ये प्रवेश केला. दुसऱया बाजुने या मतदारसंघात स्थानिक आमदार असल्याने भाजपाने एलिना साल्ढाना यांच्या व्यतिरीक्त अन्य पर्यायाचा फारसा विचार केला नव्हता. ऐनवेळी पर्यायावर विचार केला तरी विजयाची हमी देणारा पर्याय त्यांना सापडला नाही. त्यामुळे उमेदवारी घेण्यासाठी अपक्षाची मनधरणी करणे भाग पडले. त्यातही अपयश आल्याने अखेर आपल्याच निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या गळय़ात अखेरच्या क्षणी उमेदवारीची माळ घालण्यात आली. पक्षाकडे विजयासाठी ठोस नियोजनही यंदा नव्हते. निवडणुकीपूर्वीच हार मानून भाजपाने अपक्षाकडे जुळवून घेतल्याची चर्चा या भागात सुरू होती. ती खरी ठरल्या सारखी स्थिती सध्या आहे.
भाजपा पाचव्या तर एलिना साल्ढाना सातव्या स्थानावर, दोन्ही काँग्रेससह अपक्ष व आरजीनेही भाव राखला
कुठ्ठाळी हा एकेकाळी काँग्रेस पक्षाचाच बालेकिल्ला होता. मगो किंवा भाजपा सारख्या पक्षांना या मतदारसंघात गौण स्थान होते. नव्वदच्या दशकात या मतदारसंघात भाजपा दीड दोन ते अडिच हजार मतदारांचा राजा होता. त्यानंतरच्या निवडणुकांमध्ये साडे तीन हजार ते चार हजार मतापर्यंत भाजपाने मजल मारली होती. 2012 मध्ये भाजपाने प्रथमच कुठ्ठाळीत विजय प्राप्त केला. आणि 2017 मध्येही भाजपाने यश खेचून आणले होते. खरे तर कुठ्ठाळीत भाजपाला पुन्हा संधी होती. विजयासाठी आधीच पूर्वतयारी झाली असती तर मतविभागणीत नावेली मतदारसंघासारखा विजय कुठ्ठाळीतही मिळाला असता. मात्र, दुर्लक्षामुळे भाजपाने हा मतदारसंघ गमावलेला आहे. सलग दोन वेळा विजय प्राप्त करून इतिहास घडवलेल्या भाजपाने यंदा या मतदारसंघात 2392 अशी पाचव्या क्रमांकाची मते मिळवलेली आहेत. विजयी अपक्ष उमेदवार अँन्थनी वास यांनी 5522 ऐवढी मते मिळवली. काँग्रेसच्या ओलान्सीयो सिमोईस यांच्याविरूध्द त्यांनी 1278 मतांची आघाडी मिळवली. गिरीष पिल्ले हे कुठ्ठाळीतील एक बहुचर्चित उमेदवार ठरले होते. त्यांनी तिसऱया क्रमांकाची 4259 ऐवढी मते मिळवून कुठ्ठाळीत आपलेही वर्चस्व सिध्द केले. ते प्रथमच विधानसभा निवडणुकीत उतरले होते. मागच्या वेळी काँग्रेसच्या उमेदवारीवर 4326 ऐवढी तिसऱया क्रमांकाची मते मिळवलेले मारीयान रॉड्रिक्स यांनी यंदा तृणमुल काँग्रेसच्या उमेदवारीवर 3246 ऐवढी चौथ्या क्रमांकाची मते प्राप्त केली. सलग दहा वर्षे कुठ्ठाळीच्या आमदार राहिलेल्या एलिना साल्ढाना यांच्या पदरात यावेळी केवळ 1355 ऐवढीच मते पडली. त्या सातव्या स्थानावर फेकल्या गेल्या. त्यांची स्थिती ना घर का ना घाट का अशी झाली. मतदारांना त्यांचा निर्णय आवडला नसावा. मागच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार अँन्थनी वास यांच्याविरूध्द भाजपातर्फे एलिना साल्ढाना यांनी 518 मतांच्या आघाडीने विजय प्राप्त केला होता. एलिनांना 5666 मते पडली तर अँन्थनी यांना 5148 मते पडली. मागच्या निवडणुकीत पाचव्या स्थानावर राहिलेल्या आम आदमी पार्टीच्या ओलान्सीयो सिमोईस यांना 2482 एवढी मते पडली होती. यंदा काँग्रेसच्या उमेदवारीवर त्यांना 4344 ऐवढी मते प्राप्त झाली. काँग्रेसला यंदा मागच्या निवडणुकीपेक्षा केवळ 18 मतेच अधिक पडली. आरजीचे उमेदवार तियोतीन कॉस्ता यांनी पदार्पणातच 2480 ऐवढी मते घेऊन आरजीचा मान राखला.









