ऑनलाईन टीम / पुणे :
पेट्रोल-डिझेल शंभर पार, मोदी बस्स करा जनतेची लूट मार…काय रे बाबा मोदी कसला रे तुझा खेळ, स्वस्त झाले मरण अन् महागले पेट्रोल-डिझेल… महागाईचा भस्मासूर नष्ट करा… अशा घोषणा देत मंगळवार पेठेतील लडकत पेट्रोल पंपासमोर काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात निदर्शने करीत मोदी सरकारचा यावेळी निषेध करण्यात आला.
पुणे शहराच्या पूर्व भागात काँग्रेस कार्यकर्ते अॅड.नितीन परतानी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे रमेश बागवे, भगवान धुमाळ, प्रा. वाल्मिक जगताप, रविंद्र मोहीते, राजेश शिंदे, वसंतराव खेडेकर, शंकर रामलर, अयाज खान, विजय वारभुवन, फय्याज शेख, लतेंद्र भिंगारे, सुनील काकडे, युवराज साबळे यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.
अॅड.नितीन परतानी म्हणाले, पेट्रोल-डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. कोविडच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे सामान्यांचे आर्थिक गणित कोलमडले असून त्यात पेट्रोल-डिझेल दरवाढ होत आहे. याकरीता मोदी सरकार जबाबदार असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार पेट्रोल- डिझेल च्या अन्यायी दरवाढीविरोधात पुणे शहर काँग्रेस कमिटी प्रभाग 16 मंगळवार पेठ तर्फे आम्ही हे निषेध आंदोलन करीत असल्याचे त्यांनी सांगितले.








