येडूर येथे 21 जवानांच्या पथकाचे स्वागतः चिकोडी तालुका प्रशासनाकडून आतापासूनच खबरदारी
प्रतिनिधी / चिकोडी
पावसाळय़ाला सुरुवात झाली असून यंदाही हवामान खात्याने मुबलक पावसाचा अंदाज वर्तविल्याने महापुराचा धोका कायम आहे. यामुळे प्रशासनाने यंदा पावसाळय़ाच्या प्रारंभीच बचावकार्य करण्यासाठी पथकाला पाचारण केले आहे. सदर पथकाचे तालुका प्रशासनाच्यावतीने चिकोडीत स्वागत करण्यात आले. तसेच त्यांच्या वास्तव्यासाठी येडूर येथे यात्री निवासात सोय करण्यात आली आहे आहे.
गेल्या दोन वर्षांत सतत महापुराच्या संकटाने चिकोडी, निपाणी, अथणी, कागवाड, रायबाग या तालुक्मयातील अनेक गावातील नागरिकांना मोठा फटका बसत आहे. शेतातील पिकांसोबत कुटुंबातील, धनधन्य, जीवनावश्यक साहित्य, वस्तू यांची नासाडी होत आहे. अनेकांना पुराच्या काळात स्थलांतरही करावे लागते. नागरिकांचा बचाव करणे, त्यांचे स्थलांतर व त्यांची सोय करण्यासाठी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागते. जिल्हा व तालुका प्रशासनाने ही तारांबळ टाळण्यासाठी पूर्व नियोजन केले असून खबरदारी म्हणून एनडीआरएफ पथकाला पाचारण केले आहे.
यात्री निवासामध्ये सोय
21 जणांच्या पथकाची तुकडी नुकतीच येथे दाखल झाली. चिकोडी येथे तालुका प्रशासनाच्यावतीने मिनी विधानसौधसमोर त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच महसूल खात्याच्या अधिकाऱयांनी पथकातील जवानांना कृष्णा नदी काठावरील विविध पूरग्रस्त गावांची माहिती दिली. त्यानंतर सदर पथकाची वास्तव्यासाठी येडूर येथील यात्री निवासामध्ये सोय करण्यात आली.









