कर्नाटक निरावरी निगम खात्याची माहिती : नोडल अधिकारीही नियुक्त
वार्ताहर / अथणी
सध्या सुरू असलेला पावसाचा जोर असाच राहिल्यास कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसे झाल्यास अथणी, रायबाग, कागवाड, जमखंडी तालुक्यांतील 26 गावांना पुराचा धोका निर्माण होतो. त्यामुळे पूरस्थिती उद्भवल्यास प्रशासनाकडून 26 बोटींची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती अथणी येथील कर्नाटक निरावरी निगमच्या कार्यालयातून देण्यात आली.
संततधार पावसामुळे कृष्णा नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या हिप्परगी येथील धरणामध्ये 1 लाख 42 हजार क्युसेक पाण्याची आवक होत असून 1 लाख 41 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. हिप्परगी धरणात 531.40 मी. इतका पाणीसाठा झाल्यास त्या 26 गावांना धोका आहे. सध्या हिप्परगी धरणातील पाणी पातळी 522.20 मी. इतकी आहे. या धरणात 527 ते 528 मीटरवर पाणी थांबल्यास अथणी तालुक्यातील जनवाड, महेशवाडगी, नंदेश्वर, सत्ती, दोडवाड, नांगनूर पी. के. औरखोड, हल्याळ व जमखंडी तालुक्यांतील हुल्याळ, आसकी, तमदड्डी, 528 ते 529 मी. पाणीपातळी झाल्यास अथणी तालुक्यातील हुलगबाळ, शेगुणशी, खवटकोप, दरूर, नदीइंगळगाव, तीर्थ, सप्तसागर व 529 ते 531 मी. पाणी थांबल्यास अथणी तालुक्यातील हल्याळ, तंगडी, कागवाड तालुक्यातील कात्राळ, बनजवाड, कुसनाळ, मोळवाड, रायबाग तालुक्यातील सिद्धापूर, खेमलापूर, जमखंडी तालुक्यातील हिप्परगी आदी गावांना दक्ष राहण्याची गरज निर्माण होते. प्रशासनाने कृष्णा काठावरील गावांसाठी नोडल अधिकारी नियुक्त केल्याची माहिती तहसीलदार दुंडाप्पा कोमर यांनी दिली.









