ओरोस महोत्सवांतर्गत आयोजन : होम मिनिस्टर स्पर्धेत नम्रता वरक विजेत्या
प्रतिनिधी / सिंधुदुर्ग:
अतिशय नेटके आणि सुंदर आयोजन, विविध राज्यांतून आलेल्या ‘एका पेक्षा एक’ अनुभवी स्पर्धकांचा सहभाग, उत्कृष्ट निवेदन, दर्शकांचा अभूतपूर्व प्रतिसाद आणि शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेली चुरस अशा रंगतदार वातावरणात पार पडलेल्या ओरोस येथील आंतरराज्य सौंदर्य स्पर्धेत रेडीच्या पूजा राणे हिने मानाचा ‘सिंधुदुर्गनगरी सुंदरी’ किताब पटकावला. मानाचा मुकूट, जरीपट्टा, सन्मानचिन्ह व रोख 10 हजार रु. देऊन पूनम राव यांच्या हस्ते तिला गौरविण्यात आले. ओरोस महोत्सवांतर्गत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत रत्नागिरीची ऋतुजा जाधव उपविजेती, तर सावंतवाडीची भक्ती जामसंडेकर तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली. या व्यतिरिक्त कुडाळची रुचिता शिर्के ही ‘फोटोजनिक फेस’, कणकवलीची उत्कर्षा पावसकर ही ‘बेस्ट स्माईल’, सावंतवाडीची विद्या मादाकाचे ही ‘बेस्ट कॅटवॉक’, ओरोसची आरती दांडगे ‘बेस्ट कॉश्युम’, तर मालवणची माधवी शहापुरे ही ‘बेस्ट कन्सलेटर’ या किताबाची मानकरी ठरली. या सर्वांना रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र देऊन पंचायत समिती सदस्य सुप्रिया वालावलकर, सिद्धी सावंत यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
ओरोस महोत्सव समिती आणि भाजपच्या युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आनंद उर्फ भाई सावंत यांच्या प्रेरणेतून ओरोस येथील या पहिल्याच भव्य अशा आंतरराज्य सुंदरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत कारवार, गोवा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व पालघर येथून 22 लावण्यवती सहभागी झाल्या होत्या.
सूत्रसंचालक संजीव साळवी यांनी स्पर्धा अधिक रंगतदार केली. परीक्षक म्हणून प्राजक्ता बिलये (सावंतवाडी) व तन्वी चांदोस्कर (देवगड) यांनी काम पाहिले. महोत्सवात ओरोसमधील महिलांना सहभाग घेता यावा, यासाठी वाडी-वाडीवर होम मिनिस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात नम्रता वरक विजेत्या, तर समिधा रासम उपविजेत्या ठरल्या.
भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आनंद उर्फ भाई सावंत यांनी स्पर्धा आयोजनामागचा उद्देश स्पष्ट केला.









