प्रतिनिधी/ म्हसवड
जवाद या चक्रीवादळाने दोन दिवसांपासून म्हसवडसह माण तालुक्यात हाहाकार घातला आहे. शुक्रवारी रात्री जोरदार पावसाने पुळकोटी (ता. माण) येथील ओढय़ाला पूर आल्याने या पुराचे पाणी पुलावरुन जोरात वाहत असताना दुचाकीवरुन दोघे म्हसवडवरुन पुळकोटी घरी जात असताना पुराच्या पाण्यात त्यांची दुचाकी वाहत गेली. यात उत्तम शंकर बनसोडे (वय 50) बेपत्ता झाले तर रणजित ज्ञानू चव्हाण हे पोहत पाण्याबाहेर आल्याने सुदैवाने वाचले. बेपत्ता बनसोडे यांचा शोध शनिवारी सायंकाळी सहापर्यत सुरू होता.
याबाबत मिळालेली माहिती याप्रमाणे गेले चार दिवसापासून सतत अवकाळी पावसाने सर्वत्र हाहाकार घातला होता. शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास जोरदार पाऊस झाला यामुळे म्हसवड परिसरातील ओढय़ांना पूर आला होता. म्हसवडपासुन सहा किलो मीटर अंतरावर असलेल्या पुळकोटी या गावाकडे जाणाऱया रस्त्यावर पूल असुन ह्या पुलावरुन तिने फुट पाणी वाहत असताना शुक्रवारी रात्री 11 च्या दरम्यान पुळकोटी येथे राहणारे उत्तम शंकर बनसोडे (वय 50) व रणजित ज्ञानू चव्हाण (वय 45) हे दोघे आपल्या मोटार सायकलीवरुन म्हसवड येथील काम करुन पुळकोटीकडे निघाले होते. पुलावरुन वाहणाऱया पाण्याचा अंदाज न घेता वाहत्या पाण्यात मोटारसायकल घातली. पाणी जास्त प्रमाणात ओढत असल्याने मोटारसायकलसह दोघेही पुलाखाली पाण्यात वाहत गेले. वाहत जात असताना मोटारसायकल चालवणारे चव्हाण पाण्याबाहेर निघाले. मात्र बनसोडे हे पट्टीचे पोहणारे असतानाही पाण्यात वाहत गेले. रात्री ही घटना गावात समजताच लोक ओढय़ानजीक जमा झाले. मात्र पाणी जास्त व पाऊस येत असल्याने काहीच करता येत नव्हते. शनिवारी सकाळपासुन पीएसआय विशाल भंडारे, तलाठी वाघमारे, पोलीस पाटील बनसोडे व पोहणारे ओढय़ात बनसोडे यांचा शोध घेत होते. शनिवारी सायंकाळी सहापर्यंत शोध सुरु होता.
घटनास्थळी माणचे तहसीलदार सुर्यकांत येवले यांनी जाऊन पीएसआय विशाल भंडारे, तलाठी वाघमारे, पोलीस पाटील बनसोडे व सरपंच सावंत यांच्याशी शोधकार्याची माहिती घेतली. पुळकोटी येथील दोन बंधारे शिरताव परिसरात आहेत तिथेही ही शोध घेतला मात्र रात्री उशिरापर्यंत तपासकार्याला यश आले नव्हते.








