वार्ताहर / पुलाची शिरोली
शिरोलीत कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली व सध्याच्या कोविड सेंटर मध्ये व्यवस्था नसल्यास ग्रामपंचायत कोविड सेंटर उभा करणार व जिल्हा आरोग्य विभाग औषधे पुरवठा करणार आहे. असा निर्णय ग्रामपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी सरपंच शशिकांत खवरे तर सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले प्रमुख उपस्थितीत होते.
शिरोलीत गेल्या पंधरा दिवसात कोरोनाचे १९ रूग्ण सापडले असुन भविष्यात रूग्ण संख्या वाढली आणि घोडावत कॉलेज, सिपीआर, डी. वाय .पाटील या ठिकाणी बेड उपलब्ध होणार नसल्यास अडचण नको म्हणून ग्रामपंचायतीने स्वतः कोविड सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
यावेळी आरोग्य सेवक यांनी शिरोलीतील ज्या लोकांना कोरोनाची लक्षणे आहेत. त्यांना शिरोलीतच उपचार सुरू करू, यासाठी लागणारी सर्व औषधे, गोळ्या, थर्मामीटर ,मास्क असे संपूर्ण किट आरोग्य विभाग पुरवठा करेल असे सांगितले.
सरपंच शशिकांत खवरे यांनी गावातील हॉटेल ताब्यात घेऊन त्या ठिकाणी कोविड सेंटर उभा करून रुग्णांना गावातील कोविड सेंटर मध्ये उपचार देऊ. यासाठी एक आरोग्य अधिकारी असणे आवश्यक आहे. यासाठी गावातील डॉक्टर असोसिएशनने मदत करावी असे आवाहन केले.
या बैठकीला तंटामुक्त अध्यक्ष सतीश पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण, उपसरपंच सुरेश यादव,विठ्ठल पाटील,प्रकाश कौंदाडे,सलीम महात, संग्राम कदम,जोतिराम पोर्लेकर,दीपक यादव, रणजित केळुसकर, सर्कल बी .एल. जाधव,ग्रामविकास अधिकारी ए. एस .कठारे, तलाठी निलेश चौगुले यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
Previous Articleएचडीएफसी बँकेचे कर्ज स्वस्त
Next Article सॅमसंग गॅलक्सी नोट 20 चे प्री बुकिंग सुरू








