वार्ताहर / पुलाची शिरोली
येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड लसीकरण ड्राय रन प्रात्यक्षिक घेण्यात आले. लस आलेनंतर कशा पद्धतीने बुथची मांडणी असेल, लाभार्थ्यांना कशा पद्धतीने सोशल डिस्टनचा वापर करून बसवण्यात येईल, लाभार्थ्यांची नोंदणी ऑनलाइन कशी केली जाईल, त्याचे रजिस्ट्रेशन कसे होईल, त्याला डोस कसा दिला जाईल, डोस दिल्यानंतर प्रतिक्षा कक्षात त्याचे तापमान, पल्स तपासणी केले जाईल, त्यांनी सोशल डिस्टन्समध्ये कसे बसायचे तसेच प्रतिक्षा कक्षात गर्दी गोंधळ होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाने करावयाचे नियोजन, प्रतीक्षा कक्षातून लाभार्थी प्रत्यक्ष लसीकरण कक्षात येईल व त्याची ऑनलाइन नोंदणी होईल. त्याने आणलेल्या शासकीय पुराव्याची पडताळणी केल्यानंतर तोच लाभार्थी आहे याची खात्री आलेनंतर त्याला लसीकरण केले जाईल. त्यानंतर सदर लाभार्थ्यास निरीक्षण कक्षात अर्धा तास बसवण्यात येईल, सदर लाभार्थ्यास काही त्रास झालेस कक्षात असणारे डॉक्टर त्याच्यावर योग्य ते उपचार करतील. तसेच अर्धा तास पूर्ण झाल्यानंतर रुग्णास काहीही त्रास नाही असे निदर्शनास आलेस लाभार्थ्यास घरी सोडण्यात येईल. तसेच घरी गेल्यानंतर लाभार्थ्यास काय त्रास झाला तर त्याने १०२ नंबर व १०८ नंबर या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधनेचा आहे. अशी संपूर्ण माहिती लाभार्थ्यांना यावेळी देण्यात आली.
सदर कार्यक्रमास जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. फारुख देसाई, तालुका आरोग्य अधिकारी पंचायत समिती हातकलंगले डॉ. सुहास कोरे, शिरोली प्राथमिक आरोग्य अधिकारी डॉ. जेसिका अँड्र्यूज, ए.एस.पाटील, घोलपे, बामणे आदींसह आरोग्य केंद्रातील कर्मचारी व आशा स्वयंसेविका उपस्थित होते.