नवे संशोधन : प्रकृती गंभीर असलेल्यांमध्ये अधिक प्रमाण मिळाले
कोविड अँटीबॉडीज महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये अधिक प्रमाणात निर्माण होत आहेत. 90 टक्के रुग्णांमध्ये या अँटीबॉडीज संक्रमणानंतर 7 महिन्यांपर्यंत राहतात असा दावा पोर्तुगालच्या वैज्ञानिकांनी स्वतःच्या संशोधनात केला आहे. युरोपियन जर्नल ऑफ इम्यूनोलॉजीमध्ये प्रकाशित संशोधनानुसार अँटीबॉडी किती तयार होतील यामागे वय हा महत्त्वाचा घटक नाही. रुग्णात कोरोनाचा किती गंभीर प्रभाव राहिला यावर अँटीबॉडीची पातळी ठरत आहे.
300 रुग्णांची सीरो चाचणी
आमच्या शरीराची इम्युन सिस्टीम कोरोना विषाणूला अगोदर ओळखते आणि नंतर लढण्यासाठी अँटीबॉडीज प्रसारित करते. या अँटीबॉडीज विषाणूशी लढण्यास मदत करतात असे पोतुर्गालमधील संशोधक मार्क वेल्धोएन यांनी म्हटले आहे. रुग्णांमध्ये अँटीबॉडीज किती प्रमाणात तयार झाल्या हे समजून घेण्यासाठी 300 कोरोनाबाधितांची सीरोलॉजी चाचणी करण्यात आली आहे.
या रुग्णांवर पुढील 6 महिन्यांपर्यंत देखरेख ठेवण्यात आली. कोरोनाची लक्षणे दिसून आल्याच्या पहिल्या 3 आठवडय़ांमध्ये अँटीबॉडीजची पातळी वाढली. एका पातळीवर पोहोचल्यावर त्यांची संख्या कमी झाल्याचे त्यांनी सांगितले आहे.
कोरोनाला न्यूट्रल करण्याची पद्धत
महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये अँटीबॉडीज अधिक प्रमाणात तयार झाल्याचे प्रारंभिक काळात दिसून आले आहे. परंतु कोरोनाशी लढण्याच्या पातळीपर्यंत दोघांमध्ये अँटीबॉडीची पातळी समान झाली आहे. कोरोनामुळे अधिक गंभीर प्रकृती झालेल्या रुग्णांमध्ये अँटीबॉडीजची पातळी अधिक होती अशी माहिती संशोधक मार्क यांनी दिली आहे. संशोधनाच्या पुढील टप्प्यात वैज्ञानिकांनी अँटीबॉडीज कोरोनाला किती प्रमाणात न्यूट्रिलाइज करू शकतात हे पडताळून पाहिले आहे.
अँटीबॉडी म्हणजे काय?

प्रोटीनने तयार झालेल्या विशेष प्रकारच्या इम्युन पेशींना बी-लिम्फोसाइटही म्हटले जाते. शरीरात जेव्हा एखादी बाहेरील गोष्ट (फॉरेन बॉडीज) पोहोचते, तेव्हा या सतर्क होतात. जिवाणू किंवा विषाणूच्या घातक पदार्थांना निष्क्रीय करण्याचे काम याच अँटीबॉडी करतात. अशा प्रकारे या पेशी शरीराला प्रतिरक्षण पुरवून सर्वप्रकारच्या रोगाणूंचा प्रभाव निष्क्रीय करतात.
चाचणीचे कार्यस्वरुप
सर्वसाधारपणे अँटीबॉडीज निर्माण होण्यास 1 आठवडय़ापासून 14 दिवसांचा कालावधी लागतो. याची पातळी इम्युन सिस्टीम आणि संपर्कात येण्याच्या वेळेवर निर्भरत राहते. परंतु कमी अँटीबॉडीजचा अर्थ तुम्ही संक्रमित नाही असा होत नाही. ही एक सर्वसाधारण रक्तचाचणीप्रमाणेच चाचणी असते अशी माहिती माउंट सिनाई हेल्थ सिस्टीमच्या क्लीनिकल लॅबोरेट्रीज आणि ट्रान्सफ्यूजन सर्व्हिसेसचे संचालक डॉक्टर जॅफ्री झांग यांनी दिली आहे.
अँटीबॉडी चाचणी
जेव्हा माणूस एखाद्या विषाणूच्या संपर्कात येतो, तेव्हा त्याचे शरीर रक्त आणि पेशींमध्ये राहणाऱया अँटीबॉडीज तयार करू लागते. या अँटीबॉडीज विषाणूला शरीरात फैलावण्यापासून रोखतात. शरीरात अँटीबॉडीजची निर्मिती होतेय की नाही हे चाचणीद्वारे पडताळून पाहिले जाते. शरीरात अँटीबॉडीज आढळल्या तर कोविड-19 च्या संपर्कात आल्याची शक्यता वाढते.









