प्रतिनिधी/ रत्नागिरी
गेले काही दिवस वातावरणात चढ-उतार पहायला मिळत आहेत. त्यामुळे वातावरण लहरी स्वरूपाचे झाले आहे. अशातच पुन्हा भारतीय हवामान शास्त्र विभाग, पुणे यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार, कोकणात तुरळक ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
येत्या 23, 24 व 25 मार्चला कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अवकाळी पाऊस, वादळाचा अप्रत्यक्ष परिणाम, वाढता उकाडा या नैसर्गिक बदलत्या समीकरणांचा परिणाम आंब्याच्या मुळावर होत आहे. फळ गळणे, डागाळणे यासारखे परिणाम होताना दिसत आहेत. तसेच 26 मार्च रोजी हवामान कोरडे राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
‘असानी’चा असाही परिणाम
असानी वादळाचा अप्रत्यक्ष परिणाम हा शहरात दिसून आला. 22 मार्च रोजी दिवसभर शहरातील वातावरण ढगाळ स्वरूपाचे होते. त्यामुळे दिवसभर पावसाची शक्यता वाटत होती. तसेच समुद्रातही लाटा फेसाळ स्वरूपाच्या होत्या.









