प्रत्येकाच्या आयुष्यात चढउतार असतात. राजकीय पक्षांच्यादेखील. आजचा रंक उद्याचा राव असतो. रावाचा कधी रंक होतो ते कळत नाही. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून विरोधी पक्षांना जणू साडेसाती लागली आहे. उत्तर प्रदेश आणि इतर तीन राज्यात ज्या धमाक्मयात भाजप परत सत्तेवर आलेली आहे त्याने 2024च्या लोकसभा निवडणुकीचा निकालदेखील लागलेला आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली नसती तरच नवल होते. विरोधी पक्षांना आता 2029च्या लोकसभा निवडणुकीसाठी तयारी करावी लागणार अशी मल्लीनाथी होऊ लागली आहे.
एकटय़ा आम आदमी पक्ष सोडला तर काँग्रेससह इतर विरोधी पक्षांना या निवडणुकीत झाडूने केवळ साफ केले आहे असे नाही तर त्यांच्यावर पोछा देखील मारला गेला आहे असा मोदी समर्थकांचा दावा आहे. तर 2024ची निवडणूक म्हणजे मोदी विरुद्ध अरविंद केजरीवाल अशी होणार असे आम आदमी पक्षाचे पाठीराखे म्हणत आहेत. दिल्ली म्युनिसिपल कॉर्पोरेशन निवडणुकात तरी भाजपने केजरीवाल यांचा धसका घेतलेला दिसत आहे. या निवडणूका गेल्या आठवडय़ात सूचित होणार होत्या तेव्हढय़ात केंद्राने आम्हाला राजधानीत असलेल्या सद्याच्या तीन कॉर्पोरेशन्सची परत एक महानगरपालिका बनवायची आहे अशी सबब सांगून त्या पुढे ढकलण्याचा डाव खेळला आहे. सद्या तिन्ही महापालिका भाजपच्या ताब्यात आहेत आणि त्यावर आप कब्जा करेल या भीतीने भाजप कासावीस झाली आहे. सात-आठ वर्षांपूर्वी दिल्लीच्या स्थानिक सरकारमधून काँग्रेसला हद्दपार केल्यापासून राजधानीतील राजकारणावर केजरीवाल यांचा पगडा आहे. मोदी आणि केजरीवाल यांचे विरोधक हे दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना ‘छोटा मोदी’ तर पंतप्रधानांना ‘बडा केजरीवाल’ असे संबोधतात. चांगले अथवा वाईट, दोघेही एकाच माळेचे मणी आहेत असे सांगण्याचा हा प्रयत्न आहे.
पंजाबमधील दैदीप्यमान विजयाने केजरीवाल यांचे राष्ट्रीय राजकारणातील स्थान उंचावले आहे. त्यांच्याकडे दोन राज्यातील सत्ता आली आहे. नवज्योत सिद्धूसारख्या भंपक माणसाला प्रदेशाध्यक्ष बनवण्याची चूक राहुल आणि प्रियंका गांधींना भोवली आहे. आता मोदींना आपल्या मनचा पुढील राष्ट्रपती बनवता येईल. रामनाथ कोविंद हे जुलैमध्ये निवृत्त होत आहेत. उत्तर प्रदेशात भाजप हारली तर राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत तिला खिंडीत पकडून पंतप्रधानांचा कोणी खंदा विरोधक पुढील राष्ट्रपती बनवायचा असे विरोधी नेत्यांच्या मनातील मांडे मनातच राहिले आहेत.
विरोधी पक्षांकरता धडा
पुढील पंतप्रधान बनण्याची घाई झालेल्या ममता बॅनर्जी आणि के चंद्रशेखर राव यांच्यासारख्या विरोधी पक्षनेत्याना मोदी अजून कळलेलेच नाहीत. उडत्या पाखराचे पंख मोजण्याचे कसब मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे आहे कारण ते 24 तास राजकारण करतात. पराभवाने खचून जात नाहीत वा विजयाने हुरळून जात नाहीत. कोणाला कसे आणि कधी खिंडीत पकडवायचे हे त्यांना चांगलेच माहित आहे. पंजाबमध्ये काँग्रेसचे कंबरडे मोडण्यासाठी भाजपने आपले मत केजरीवाल यांच्याकडे वळवले होते असे राजधानीतील राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. एकीकडे भाजपपासून फुटलेल्या अकाली दलाचे बारा वाजवायचे आणि दुसरीकडे काँग्रेसला कमजोर करायचा हा डाव यशस्वी झाला आहे.
मोदी-शहा यांच्या नावाने खडे फोडण्यापेक्षा त्यांना आणि त्यांच्या राजकारणाला जोपर्यंत विरोधक नीटपणे समजून घेत नाहीत तोवर भाजपचा ग्राफ खाली येण्याची शक्मयता नाही. भाजपची बलस्थाने कोणती आणि त्याच्या नाजूक जागा कोणत्या हे फक्त जाणूनच उपयोगी नाही पण त्याद्वारे सत्ताधाऱयांना अडचणीत कसे आणावयाचे हे ही कळावे लागेल. ममतांनी काँग्रेसचे तोंडही न बघण्याची जवळजवळ शपथ घेतली आहे तर केजरीवाल यांचे राजकारण स्वकेंद्रीतच राहिले आहे. अशा वेळेला भाजप विरुद्ध एकसंघ आघाडीची शक्मयता कितपत? मायावती या स्वतःला विरोधी पक्षाच्या नेत्या समजतात पण काँग्रेसलाच नेहेमी निशाण्यावर घेतात, भाजपला घाबरतात. याला काय म्हणावे?
राहुल गांधी राजकारणात येऊन 18 वर्षे झाली. त्यांना आता कोठे राजकारण थोडेफार समजू लागले आहे. त्यांनी मुद्दे चांगले उचलले आहेत पण ते घेऊन जनतेपुढे कशा पद्धतीने जायचे याची त्यांना ठीक जाण नाही. प्रियंकांना उत्तर प्रदेशची जबाबदारी देऊन काँग्रेसने त्यांचे नेतृत्वच खच्ची करण्याचे काम केले आहे असा खेदाचा सूर पक्षात ऐकू येत आहे.
या पराभवानंतर काँग्रेसकडे केवळ राजस्थान आणि छत्तीसगढ ही दोनच राज्ये राहिली आहेत आणि एखाद्या प्रादेशिक पक्षासारखी त्याची अवस्था झाली आहे. रामचंद्र गुहांसारख्या ज्ये÷ विचारवंत तर अतिशय कडवटपणे म्हणत आहेत कि काँग्रेस आणि देशाचे भले करण्यासाठी सोनिया, राहुल आणि प्रियंका गांधींनी ताबडतोब राजकारणातून कायमची निवृत्ती घ्यावी. राहुल यांच्यासारखा नादान प्रतिस्पर्धी असल्यानेच मोदींचे राष्ट्रीय राजकारणात फावत आहे असा गुहा यांचा जुना सिद्धांत आहे. गांधी घराण्यावर खुश नसलेला काँग्रेसमधील एक वर्ग केजरीवाल यांचा पक्ष हळूहळू काँग्रेसची जागा घेऊ लागला आहे असा युक्तिवाद करत आहे.
सर्वच विरोधी पक्षांना भेडसावणारी एक मोठी समस्या म्हणजे प्रसारमाध्यमे विशेषतः राष्ट्रीय वर्तमानपत्रे आणि बऱयाच न्युज चॅनेल्सनी घेतलेली भूमिका. यांनी विरोधी पक्षांना आपल्या बातम्यातून जवळजवळ अदृश्य करून टाकले आहे. सरकारला प्रश्न विचारण्यापेक्षा विरोधी पक्षाना प्रश्न विचारण्याची अजब पद्धत त्यांनी पाडली आहे. ‘मोदी हैं तो मुमकिन हैं।’ चा नारा या निवडणुकात अक्षरशः खरा ठरला असला तरी त्याचा अर्थ पुढील लोकसभा निवडणूक देखील मोदींनी खिशात घातली आहे असा नाही. राजकारणाचे रंग कधीकधी एक आठवडय़ात देखील बदलतात असे म्हणतात आणि लोकसभा निवडणुकीला अजून दोन वर्षांचा अवधी आहे. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर झालेल्या निवडणुकीत भाजपला 543 पैकी अवघ्या दोन जागा मिळाल्या होत्या पण त्याचा अर्थ तो पक्ष संपला नव्हता. विरोधी पक्षांना पुनश्च हरि ओम म्हणून सुरुवात करावी लागणार आहे इतकेच.








