50-60 वर्षांपूर्वी एकत्र कुटुंबपद्धती शहरात किंवा खेडय़ात बऱयाच प्रमाणात नांदत होती. घरात मुलांची संख्याही बरीच असायची. सख्खी, चुलत, आते, मामे अशी बरीच भावंडे एकाच छताखाली गुण्यागोविंदाने राहायची. पण तेव्हा मोठय़ांचा धाक, शिक्षकांचा वचक आणि शेजारपाजाऱयांचाही दरारा असे. फक्त घरातलेच नव्हेत, तर रितीसाठी शेजारच्या एखाद्या मोठय़ा व्यक्तीने मुलांचे कान उपटले, तरी कोणी वाईट वाटून घेत नसे. कारण घरोघरी हे मान्य होते म्हणा ना! म्हणूनच त्या काळात कोणी वडिलधाऱया माणसांचा मार किंवा ओरडा खाल्ला नाही असा विरळाच असणार. मात्र बापाच्या चप्पल जेव्हा मुलाच्या पायाला येत, तेव्हा तो मोठा झाला, त्याला मारणे गैर आहे, असे समजले जाई. म्हणूनच कदाचित ह्या संस्कारांचे मूळ पुढील श्लोकात आहे असे वाटते.
लालयेत् पञ्चवर्षाणि दशवर्षाणि ताडयेत्।
प्राप्तेषु षोडषे वर्षे पुत्रे मित्रावदाचरेत्।।
अर्थ-मुलांचे पाच वर्षांपर्यंत लाड करावेत, दहाव्या वर्षांपर्यंत मारावे, सोळा वर्षांचा झाला की, बापाने त्याच्याशी मित्राप्रमाणे वागावे. याचा अर्थ 15व्या वर्षांपर्यंत त्याला सतत बडवावे असा होत नाही. म्हणजे त्याची चूक दाखवण्यासाठी त्याला मार द्यायचाच झाला, तर तो वयाच्या 15व्या वर्षांपर्यंत चालेल. पण 5 वर्षांपूर्वी नाही आणि 15नंतरही नाही. पूर्वी ‘छडी लागे छमछम। विद्या येई घमघम।।’ अशी म्हण होती. त्यामुळे शाळेत शिस्त नांदत होती. सगळेच शिक्षक मारकुटे होते असे नाही. पण त्यांनी शिस्तीसाठी, अभ्यासासाठी मारलेच तर पालक कधी शाळेत तक्रारही करीत नसत. उलट कित्येक जुने विद्यार्थी आज ‘आमच्या शिक्षकांनी आम्हाला वेळीच छडय़ा दिल्या म्हणून आम्ही शिकलो, सुधारलो!’ असे सांगणारे भेटतात. आज जमाना बदलला आहे. एक किंवा दोनचा जमाना असल्याने आणि विभक्त कुटुंब पद्धतीमुळे आईवडील मुलांच्या बाबतीत फार हळवे असतात. त्यांचे अगदी शब्द झेलायला तयार असतात. त्यांना कशाचाही अभाव जाणवू देत नाहीत. त्यामुळे मुलांची वृत्ती आत्मकेंद्रित होताना दिसते. आता सरकारनेच छडी वापरायला किंवा ओरडायलाही शिक्षकांना मज्जाव केला आहे. तेव्हा उगीच नसत्या फंदात कशाला पडायचे असा विचार करून शिक्षक विद्यार्थ्यांचे सर्व चाळे खपवून घेतात. अभ्यासाची जबरदस्ती करू शकत नाहीत. त्यामुळे आता ना शिक्षकांचा वचक, ना आईबापांचा! त्यामुळे ही मुले कुणालाही घाबरत नाहीत. स्वैर वर्तन करतात. कुणी त्याबद्दल पालकांना सांगितलेच तरी आपले मूलच कसे योग्य आहे, तो अजिबात काही गैर करणार नाही असे ठामपणे सांगून त्याला पाठीशी घालतात. त्याचा गैरफायदा स्वार्थासाठी बरीच मुले घेताना दिसतात. असो. आता छडीही गेली नि शिस्तही गेली. इंग्रजीत एक म्हण आहे, spare the rod and spoil the child. छडी टाकून द्या व पोरांचे वाटोळे करा. आता असे कोणी म्हटले तरी त्याला शिक्षा होईल! आणखी एक श्लोक आहे. बऱयाच जणांना तो आवडणार नाही व पटणारही नाही.
लालने बहवो दोषास्ताडने बहवो गुणाः।
तस्मात् पुत्रं च शिष्यं च ताडयेत् न तु लालयेत्।।
अर्थात लाड करण्यात खूप दोष आणि मारण्यात खूप गुण आहेत. म्हणून मुलाला आणि शिष्याला मारावे. त्यांचे लाड करू नयेत. असे पूर्वी समजले जात होते. पण अति मारणे आणि अति लाड करणे दोन्ही वाईटच. पण अजिबात लाड न करणे व अजिबात न मारणे हेही वाईटच. तेव्हा ह्या दोघातला सुवर्णमध्य काढणे हे केव्हाही चांगलेच नाही का?
व्यावहारिक संस्कृत-
अहं पाठशालां गच्छामि। मी शाळेला जातो/जाते. त्वं दुग्धं पिबसि। तू दूध पितोस/पितेस. सः गृहे वसति। तो घरी राहतो. एषा चित्रं पश्यति। ही चित्र पाहते. भवान् क्रीडाङ्गणे क्रीडति। आपण (पुं) क्रीडांगणावर खेळता. भवती प्रतिदिनं नृत्यति। आपण (स्त्री.) दररोज नृत्य करता.
1-10 पर्यंत संख्या-एकम्, द्वे, त्रीणि, चत्वारी, पञ्च, षट्, सप्त, अष्ट, नव, दश.
अनुराधा दीक्षित








