युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर जेलेंस्की यांची मुलाखत
युक्रेनची राजधानी कीव्हमध्sय रशियाच्या हल्ल्यादरम्यान अध्यक्ष वोल्दोमिर जेलेंस्की यांनी बंकर (खंदक)मधून एका जागतिक वाहिनीला मुलाखत दिली आहे. येथे चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी नव्हे तर जीव वाचविण्यासाठी आम्ही आहोत. पूर्ण जगाला ब्लादिमीर पुतीन यांच्या या हल्ल्याच्या विरोधात लढावे लागणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
रशिया-युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या शांतता चर्चेबद्दल विचारलेल्या प्रश्नावर बोलताना जेलेंस्की यांनी युक्रेनच्या शहरांवर रशियाचे हल्ले सुरू असेपर्यंत शांततेची कुठलीच शक्यता नसल्याचे म्हटले आहे. युक्रेन हे युरोपचे हृदय असून युरोप ते गमावू इच्छिणार नाही. आम्ही रशियाशी चर्चा करत आहोत. परंतु पुतीन काही मान्य करत नसल्याने हा स्पष्टपणे वेळ घालविण्याचा प्रकार असल्याचे जेलेंस्की म्हणाले.
युक्रेनचे लोक आदर्श
मी कुठलाच आयकॉन (आदर्श) नाही, युक्रेनचे लोक आयकॉनिक आहेत. ही युक्रेनला वाचविण्याची लढाई आहे. अमेरिकेच्या जो बिडेन प्रशासनाला रशियाविरोधात कठोर आणि मोठा निर्णय घ्यावा लागेल. युक्रेनच्या नाटोतील समावेशाचा निर्णय अमेरिकेला घ्यायचा आहे. आम्हाला नाटो अन्यथा सुरक्षेची हमी मिळावी. रशियाच्या सीमेवरून कुणी कधीच हल्ला करणार नसल्याची ही हमी असेल असे जेलेंस्की यांनी म्हटले आहे.
युरोपीय महासंघाचे सदस्यत्व
युक्रेनची सदस्यत्वाची विनंती योग्य असून पुढील आठवडय़ात होणाऱया बैठकीत सदस्यत्वासंबंधी विचार केला जाणार असल्याचे युरोपीय महासंघाच्या उपाध्यक्ष मार्गरीटा शिनासो यांनी म्हटले आहे. तत्पूर्वी जेलेंस्की यांनी युरोपीय महासंघाला संबोधित केले. आम्ही आमच्या जन्मभूमीच्या रक्षणासाठी लढत आहोत. आम्हालाही स्वातंत्र्य प्रिय आहे. आमच्या शहरांना घेरण्यात आले असले तरीही आमच्या एकतेला कुठलीच शक्ती तोडू शकत नाही. युरोपीय महासंघाला तो सत्यासोबत असल्याचे सिद्ध करावे लागेल. हा मुद्दा केवळ युक्रेनचा नव्हे तर पूर्ण मानवतेचा असल्याचे उद्गार त्यांनी काढले होते.









