ऑनलाईन टीम / पुणे :
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुन्हा एकदा पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये सोमवारपासून 10 दिवसांचा लॉक डाऊन जारी करण्यात आला आहे. या लॉक डाऊनला भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी विरोध दर्शवला आहे.
ते म्हणाले, शहरात लॉक डाऊन चा निर्णय घेताना लोक प्रतिनिधींना विश्वासात घेतले नाही. पालकमंत्री अजित पवार यांनी काही अधिकाऱ्यांशी चर्चा करून हा एकतर्फी निर्णय घेतला आहे. मास्क लावला नाही, शारीरिक अंतर पाळले नाही तर कडक कारवाई करा, पण तीन टक्के प्रतिबंधित क्षेत्रातील लोकांसाठी 97 टक्के पुणेकरांना वेठीस का धरता? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
हा निर्णय घेताना लोक प्रतिनिधींना दूर ठेवले हे अत्यंत चुकीचे आहे. कारण लोक प्रतिनिधी हे फिल्डवर काम करत असतात. त्यातच आत्ताच कुठे रुळावर येत असलेली घडी आता पुन्हा केलेल्या लॉक डाऊनमुळे विस्कटणार आहे. अशा शब्दात त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली तसेच अशा प्रकारे पवार यांनी पुण्याच्या बाबत निर्णय घेतले तर आम्ही बघून घेऊ काय करायचे ते, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.








