ऑनलाईन टीम / पुणे :
पुण्यात पुन्हा एकदा गव्याचे दर्शन झाले आहे. बावधन परिसरात हा गवा आढळला आहे. पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गालगत केंद्र सरकारची हाय एनर्जी मटेरियल लॅबोरेटरी अर्थात HEMRL नावाची संस्था आहे. हा गवा सध्या या संस्थेची कंपाऊंड वॉल आणि महामार्ग यांच्या मध्ये असलेल्या झाडीमधे आहे. या गव्याला पकडण्याऐवजी त्याला पुन्हा दाट झाडीमध्ये घालवून देण्याचा वनविभागाचा विचार सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काही वेळापूर्वी कम्पाऊंड वॉलच्या शेजारी, अगदी महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या वाहनांना दिसणारा गवा आजूबाजूला हालचाल वाढल्याने दाट झाडीमध्ये गेला आहे. पण सध्या जिथे हा गवा आहे ती अतिशय चिंचोळी जागा आहे. महामार्ग आणि कंपाऊंड वॉल यांच्यामध्ये असलेल्या जागेमध्येच त्याचा वावर आहे आणि त्याच्यावर याच ठिकाणी नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे. वनविभागाचे त्यादृष्टीने प्रयत्न सुरु आहेत.
दरम्यान, यापूर्वी 9 डिसेंबर रोजी पुण्यातील कोथरूड परिसरात गवा आला होता. त्यानंतर या गव्याला बघण्यासाठी आणि त्याचे फोटो आणि व्हिडीओ हातातील मोबाईल कॅमेऱ्यात टिपण्यासाठी लोकांची जी गर्दी उसळली त्यामुळे हा गवा बिथरला आणि सैरावैरा पाळायला लागला. अनेक तासांच्या प्रयत्नानंतर या गव्याला पकडण्यात यश आले होते. मात्र, काही वेळातच या गव्याचा मृत्यू झाला होता.








