ऑनलाईन टीम / पुणे :
बेकायदेशीरपणे फोन टॅपिंग प्रकरणी पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याविरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रश्मी शुक्ला या राज्य गुप्त वार्ता विभागाच्या तत्कालीन आयुक्त पदावर कार्यरत होत्या. सध्या त्या केंद्रीय प्रतिनियुक्तीवर हैद्राबाद येथे कार्यरत आहेत.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रश्मी शुक्ला यांच्यावर फोन टॅपिंगचा आरोप केला होता. रश्मी शुक्ला यांच्यावर बेकायदा फोन टॅपिंग करून पोलिसांच्या बदल्या आणि नियुक्त्यांशी संबंधित संवेदनशील कागदपत्रे उघड केल्याचा ठपका आहे. त्यावर तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे यांची समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने राज्य शासनाला अहवाल दिल्यानंतर शासनाने दिलेल्या आदेशानुसार आता रश्मी शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, फोन टॅपिंग प्रकरणी मुंबई पोलिसांच्या सायबर विभागानेही शुक्ला यांच्यावर एक गुन्हा दाखल केला आहे. तो रद्द करण्याच्या मागणीसाठी शुक्ला यांनी यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयातही धाव घेतली होती.