प्रतिनिधी / सातारा :
सध्या सुरु असलेल्या सातारा ते मिरज डबलट्रॅकची सदयस्थिती काय आहे? निरा, वाठार, रहिमतपूर, पळशी, ताकारी याठिकाणी ओव्हरब्रिजची सुरु असलेली कामे कधी पूर्ण होणार, या कामांची मुदत किती आहे, सातारा येथे मालगाडयांसाठी वेअर हाऊस उभारणेच्या कामाचे आणि पुणे-सातारा विद्युत इंजिन वाहतुकीची आत्ताची परिस्थिती काय आहे, अशा प्रश्नांची विचारणा करत, पुणे-सातारा-कराड रेल्वेची शटल सेवा सुरु करावी, अशी आग्रही मागणी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी केली. भारतीय रेल्वे सर्वसामान्य प्रवाश्यांचे आणि माल वाहतुकीचे मुख्य साधन आहे, हे सार्थ ठरवण्यासाठी सुरु असलेले रेल्वे प्रकल्प वेळेत पूर्ण करावेत. नवीन प्रकल्प सुधारणांचे प्रस्ताव द्या, आमचे नेहमीच त्यासाठी सहकार्य व पाठपुरावा राहील अशी आश्वासक भुमिका त्यांनी मांडली.
पुणे रेल्वे विभागाच्या डिआरएम रेणु शर्मा यांचेसमवेत खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आज भारतीय रेल्वेच्या विभागीय मुख्यालयाच्या कार्यालयात बैठक घेतली. त्याबैठकीत भारतीय रेल्वे प्रशासनाशी निगडीत, पुणे विभागातील सुरु असलेल्या विविध कामांचा आढावा घेताना ते बोलत होते. आम्ही प्रस्तावित केलेले सातारा येथील सुशोभिकरण तसेच वाठार रेल्वे स्टेशनचे पूरातन स्थापत्य वास्तुकला दर्शवणारे सुशोभिकरण ही कामे लवकर पूर्ण झाली पाहीजेत. सातारा-मिरज रेल्वे ट्रॅकच्या दुहेरीकरण आणि कराड-चिपळुण नवीन रेलट्रॅक ही कामे आव्हानात्मक आहेत. रेल्वेच्या दळणवळणाची गती चौपट पाचपट होण्याबरोबरच सर्वांच्या अमुल्य वेळेची बचत होणार आहे. रेल्वे-क्रॉसिंगसाठी रस्ते वाहतुक थांबवणे ही कृती अजुनही ब्रिटीश काळात असल्याची जाणिव वाटणारी आहे, त्यामुळे नागरीकांच्या हितासाठी लोणंद, पळशी, निरा, सातारा रहिमतपूर, ताकारी येथील मुख्य रेल्वे क्रॉसिंगच्या ओव्हरब्रिजचे कामाला गती देवून ती कामे वेळेत पूर्ण करणे आपली जबाबदारी आहे.
सातारा आणि कराडवरुन दररोज पुणे येथे प्रवास करणारांची संख्या निश्चितच मोठी आहे.या मार्गावर नोकरीच्या वेळेत शटल सेवा सुरु केल्यास, रेल्वेला नवीन उत्पन्न मिळण्याबरोबरच रस्त्याने प्रसाव करणा-या प्रवाश्यांना प्रवासाचा शिण वाटणार नाही. यासाठी तातडीने पावले उचलावीत. शटल सेवा सुरु करण्याचा प्रस्ताव पूर्वी दिला होता. त्यातील तृटी दूर करुन, परिपूर्ण प्रस्ताव दयावा. सालपे ते वाठार- 100 कि.मी. प्रतितास आणि जेजुरी ते वाठार 130 कि.मी.प्रतितास वेग ठेवण्याबाबतचे नियोजन अंमलात आणावे, ट्रेन नंबर 12630 कर्नाटका संपर्क क्रांती व्हाया पुणे-सातारा जाणा-या गाडीला सातारा येथे 2 मिनीटांचा थांबा मिल्ट्री लोकांसाठी आवश्यक आहे.